

Konkan Railway Ticket Checking Drive May 2026: कोकण रेल्वे मार्गवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली. विनातिकीट आणि अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणीची मोहीम तीव्र केली. नुकत्याच संपलेल्या मे महिन्यात कोकण रेल्वेने राबवलेल्या विशेष मोहिमेत हजारो प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे फुकट्या प्रवाशांचे धाबे दणाणले आहेत.
अधिकृत आकडेवारीनुसार, मे महिन्यात कोकण रेल्वे प्रशासनाने नियमित तिकीट तपासणीसोबतच तब्बल 951 विशेष तिकीट तपासणी मोहिमांचे आयोजन केले होते. या धडक मोहिमेदरम्यान रेल्वे स्थानके आणि धावत्या गाड्यांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत एकूण 61,051 प्रवासी अनधिकृत किंवा विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. कोकण रेल्वेने या सर्व नियमबाह्य प्रवाशांवर कडक कायदेशीर कारवाई करत, त्यांच्याकडून रेल्वेचे थकीत भाडे आणि दंडापोटी तब्बल 3 कोटी 70 लाख रुपयांचा महसूल वसूल केला.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने या कारवाईनंतर सर्वसामान्य आणि प्रामाणिक प्रवाशांना एक जाहीर आवाहन केले. रेल्वेने म्हटले की, प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि कोणत्याही त्रासाशिवाय व्हावा, यासाठी प्रत्येकाने नेहमी वैध तिकीट खरेदी करुनच प्रवास करावा. अधिकृत आणि प्रामाणिक प्रवाशांना (Passenger) प्रवासादरम्यान जास्तीत जास्त आराम आणि सुविधा मिळावी, तसेच गाड्यांमधील अनावश्यक गर्दी टळावी, या उद्देशाने कोकण रेल्वे आगामी काळातही ही तीव्र तिकीट तपासणी मोहीम अशीच सुरु ठेवणार आहे.
विशेष म्हणजे, ही मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) चे जवान संयुक्तपणे संपूर्ण मार्गावर तैनात राहणार आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकावर आणि गाड्यांमध्ये संशयास्पद प्रवाशांची कसून चौकशी केली जाईल. सर्व प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला या मोहिमेत पूर्ण सहकार्य करावे आणि स्वतःसोबतच इतरांचाही प्रवास सुरक्षित, संरक्षित आणि सुखकर ठेवण्यास मदत करावी, अशी विनंती कोकण रेल्वेकडून करण्यात आली. वैध तिकीटाशिवाय प्रवास करणे हा कायदेशीर गुन्हा असून, यामुळे मोठ्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही या निमित्ताने देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.