King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

Goa Carnival King Momo: गोवा पर्यटन विभागाने यंदाच्या उत्सवाचा अधिपती म्हणजेच 'किंग मोमो' म्हणून मडगावचे सेड्रिक डी कोस्टा यांची निवड केली
Cedric D Costa King Momo
Cedric D Costa King MomoDainik Gomantak
Published on
Updated on

goa carnival 2026 news: गोव्याच्या सांस्कृतिक जीवनातील सर्वात मोठा आणि रंगतदार उत्सव असलेल्या 'कार्निव्हल २०२६' ची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. गोवा पर्यटन विभागाने यंदाच्या उत्सवाचा अधिपती म्हणजेच 'किंग मोमो' म्हणून मडगावचे सेड्रिक डी कोस्टा यांची निवड केली आहे. १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राज्यातील मुख्य शहरांमध्ये कार्निव्हलच्या भव्य परेडचे आयोजन करण्यात येणार असून, सेड्रिक डी कोस्टा यांच्या नेतृत्वाखाली हा आनंदोत्सव रंगणार आहे.

कोण आहेत सेड्रिक डी कोस्टा?

मडगावमधील अक्वे-आल्तो येथील रहिवासी असलेले सेड्रिक डी कोस्टा हे केवळ एक नाव नसून ते गोव्यातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व आहेत. व्यावसायिक पत्रकार, निवेदक आणि माजी कॉर्पोरेट बँकर अशी त्यांची ओळख आहे.

त्यांचे बालपण मडगाव, कुडतरी आणि पणजी अशा विविध भागांत गेले असल्याने त्यांना गोव्याच्या मातीची, संस्कृतीची आणि लोकांची सखोल जाण आहे. केवळ ग्लॅमरस कारकीर्दच नव्हे, तर पर्यावरणाप्रती असलेली त्यांची निष्ठा ही त्यांच्या निवडीतील महत्त्वाचा घटक ठरली आहे.

शाश्वत आणि 'ग्रीन कार्निव्हल'वर विशेष भर

सेड्रिक डी कोस्टा हे गेल्या अनेक वर्षांपासून शाश्वत जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत आहेत. शालेय विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांनी निसर्गप्रेमाचा संदेश रुजवला आहे.

पर्यटन संचालक केदार नाईक यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करताना सांगितले की, "सेड्रिक हे गोव्याच्या भावनेचे प्रतिनिधित्व करतात. ते सृजनशील तर आहेतच, पण सामाजिक भान असलेले नागरिकही आहेत."

Cedric D Costa King Momo
Goa Carnival: 'कार्निव्हल' ही गोव्याची संस्कृती नाही, पण साजरा झाला तो 'गोव्याचा सांस्कृतिक उत्सव' म्हणूनच

मज्जा-मस्तीसोबतच सामाजिक संदेशाची जोड

किंग मोमो म्हणून निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना सेड्रिक म्हणाले, "हा केवळ माझा सन्मान नसून गोव्याच्या आनंदी वृत्तीचा सन्मान आहे. कार्निव्हल हा उत्सव एकता आणि आनंदाचे प्रतीक आहे.

यंदा आपण केवळ मज्जा-मस्तीच करणार नाही, तर शांतता, बंधुभाव आणि विशेषतः 'स्वच्छ आणि हरित' (Clean and Green) कार्निव्हलचा संदेश जनमानसात पोहोचवणार आहोत." त्यांच्या या विधानातून यंदाच्या उत्सवाला एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील चार प्रमुख शहरांत रंगणार सोहळा

यंदाचा कार्निव्हल प्रामुख्याने पणजी, मडगाव, वास्को आणि म्हापसा या शहरांमध्ये आयोजित केला जाणार आहे. नेहमीप्रमाणेच भव्य फ्लोट्स, संगीत, नृत्य आणि पारंपरिक वेशभूषेतील कलाकार पर्यटकांचे आकर्षण ठरतील. पर्यटन विभागाने या उत्सवासाठी जय्यत तयारी केली असून, देश-विदेशातील पर्यटकांना गोव्याच्या या अनोख्या सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com