

विनायक खेडेकर
कबुलीजबाब लिहून देण्यात येत आहे की ‘कट्टी फुगडी नामक नृृृत्य-प्रकाराचा काही अंशी संस्कृतीत समावेश होणे व त्याद्वारे सांस्कृतिक प्रदूषण फैलावण्याला आम्ही आणि आम्हीच जबाबदार आहोत.
घडले काय की, आम्ही त्या काळी गोव्यातील लोककला प्रकारांचा धांडोळा घेणे व महोत्सवातून ते लोकांसमोर आणणे यात व्यग्र होतो. अशा वेळी धडे सावर्डे येथील सिद्धारूढ क्लब नामक संस्थेचे काही लोक माझ्या मागे भूणभूण लावून होते की त्यांच्याकडे ‘कट्टी फूगडी’ नामे होणारा लोक-नृत्यप्रकार मी पाहावा. पण ते जमले नाही.
मी राज्य पातळीवरील लोककला महोत्सवात व्यग्र होतो. एका बेसावध क्षणी त्यांना म्हटले, ‘तुम्ही या महोत्सवातच दाखवा ना‘. पाहिले ते असे; काही मुली मांड्या उघड्या टाकणाऱ्या, कास मारून साड्या नेसलेल्या, दोन्ही हातातील करवंट्या माडीखाली, बाजूना वर-खाली अशा ‘कट् कट्’ वाजवत नृत्यरचनेत नाचताहेत. चौकशीतून समजले की स्कूल गॅदरिंगचा भाग होता.
वेळ निघून गेली होती. त्या काळी तिमोती फर्नांडिस यांचे एक कला पथक जोरात होते. पर्यटकांसाठी हॉटेल्स, बोट क्रूजवर अशी आमंत्रणे त्याला असत. त्याने ही ‘कट्टी फुगडी’ उचलली. हळूहळू चवथीत गणेशासमोर घातली जाणारी फुगडी असे निवेदन झाले. आजही बोटीवर हा प्रकार चालू असेल. गोमंतकीय लोककला कायम प्रदूषित राहिल्या.
या ‘कट्टी‘चा माझ्यावर शेकणारा दुसरा किस्सा. का कोण जाणे पण या तिमोतीबद्दल गोव्याच्या सचिवालयाला विलक्षण प्रेम. अति महनीय पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जायचा त्याची जबाबदारी कला अकादमी म्हणजे माझ्यावर. पंतप्रधान इंदिरा गांधी येणार होत्या. कार्यक्रमात कोणकोणते प्रकार असावेत हे निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांनी बैठक बोलावली अकादमी संकुलात.
यात ‘कट्टी फुगडी’ असावी असे सांगून मुख्य सचिव थांबले नाहीत तर जवळपास घोटाळणाऱ्या तिमोतीला बोलावून सांगूनही टाकले.‘कार्यक्रम व्यवस्थित होईल. मला तेथे उपस्थित न राहण्याची परवानगी असावी’, अशी विनंती मी केली. त्यावर आलेल्या ‘का?’ या प्रश्नाला माझे उत्तर होते ‘कारण आपल्या पीएमना संस्कृतीची चांगली जाण आहे. त्यांनी कट्टीचा सांस्कृतिक स्रोत विचारला तर माझ्याकडे उत्तर नसेल‘. सीएसनी आदळ-आपट करीत बैठक गुंडाळली. ‘कट्टी’ कायमची फुटली. प्रदूषण टळले.
पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेल्या ब्राझील देशात ‘कार्निव्हल‘ असा एक उत्सव दर वर्षी मोठ्या धामधुमीत साजरा व्हायचा. तेथील काही फोटो मिळवून, ‘असाच गोव्याचा सांस्कृतिक उत्सव म्हणून ‘कार्निव्हल’ व्हावा, तो पर्यटकांना खूप भावेल. त्या निमित्ताने पर्यटक गोव्याकडे अधिक आकृष्ट होतील’ अशी हवा निर्माण करण्यात आली. ‘कार्निव्हल ही गोव्याची संस्कृती नाही‘ अस ठासून सांगत मी याला विरोध केला. अखेर मुख्यमंत्र्यांकडील बैठकीत, ‘कल्चरल‘ नव्हे, ‘टूरिस्ट फेस्टिव्हल‘ म्हणून तो साजरा होईल, असे सांगून मला गप्प केले. पण साजरा झाला तो ‘गोव्याचा सांस्कृतिक उत्सव’ म्हणूनच!
सांस्कृतिक क्षेत्रात अशा राजकीय फसवणुकींची नोंद ठेवणे गरजेचे आहे. कार्निव्हलसाठीचे तीन दिवस विशेषतः ख्रिश्चनात बहुसंख्य असलेल्या गावडा जमातीसाठी ‘इंत्रुज‘ नामे होणाऱ्या शिगमासम उत्सवाचे होते. उच्चभ्रू तथा काही पोर्तुगालप्रेमी सोडले ‘कार्निव्हल’ हा शब्दही गोव्याला अपरिचित होता. नोंद याचीही हवी की ख्रिस्ती धर्मात नसलेला हा प्रकार धर्मांतरितांची माथी भडकू नयेत यासाठी केलेला राजनीतीतला उत्सव आहे.
याची सुरुवात व सांगता मांड या पवित्र स्थानी होते. काही किरकोळ फरक सोडले तर विधी-विधानांचे आचरण कलात्मक आविष्करणच नव्हे तर काही गीतपंक्तीही मूलाश्रमातील आहेत. जुन्या काबिजादीतील शहरातून कार्निव्हलचे आक्रमण वाढल्याने ‘इत्रुंज‘ तेथून पळाला. काही दूरस्थ खेड्यापाड्यातून आजही होतो, भोगावळ रूपात. आंबावली हा केपेतील गाव ‘मांड‘ या संकल्पनेच्या अस्तित्वासाठी धर्मसंस्थेकडे लढतो आहे.
मध्य गोव्यातील फोंडा, सांगे अशा भागात शिगमा उत्सवात ‘वीरभद्र‘ असा प्रकार होतो. मुळात हा पूर्ण कर्नाटकी. साधारणतः सत्तरच्या दशकापर्यंत त्याची वेषभूषा त्याच ढंगाची होती. म्हैसूर प्रांतात हमखास आढळणारी. कंबरेला चुण्या काढून बांधलेली हिरवी साडी. उघडे अंग. हात दंडांवर राजेशाही आभरणे, गळ्यात भरगच्च आभूषणे, मस्तकी मुकुट. पाठीला बांधलेल्या अबदागिरीवर जरी पद्धतीची कलाकुसर.
प्रारंभी दोन्ही हाती पेटती चूड, मागाहून नंग्या तलवारी. या नृत्याच्या वेळी सोबतचे गण म्हणत असलेले, ‘था थय्या-थक थय्या’ व वाद्य वादन त्याच पद्धतीचे. मधले ‘पेणे’ (थांबणे) यावेळी गण घोषणा देतात याला ‘वरावणी‘ ही संज्ञा. ही कानडीतून. ‘कैलास वळिगे वीरभद्र आण्णा‘ हे एकानेच म्हणायचे. नग बाजी सर्व गण एकसाथ ‘हा उदो‘ म्हणतात. ‘औदु’ म्हणजे होय‘. गोव्यातील गाराभ्यात अनेक ठिकाणी ‘हय‘ म्हणतात तसेच हे. विद्यमान काळातला वीरभद्र ना कर्नाटकी ना गोव्याचा . त्याचे नाचणे, ‘वरावणी’ सारेच कृत्रिम वाटावे असे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.