खरी कुजबुज: शेर आया शेर!

Khari Kujbuj Political Satire: सेंट फ्रांसिस झेवियर विषयी आक्षेपार्ह विधान केल्यावरून कोठडी मिळालेल्या गौतम खट्टर याने कोठडीतून सुटताच धर्माचा विजय असो, अधर्माचा पराजय होवो, असे म्हटले आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

धर्म आपापल्या जागी ठेवा!

राज्यात सध्या धर्माच्या नावावर जरा जास्तच “सक्रियता” दिसतेय म्हणे! एखाद्याने शिंकले, तरी तो कोणत्या धर्माचा होता, यावर चर्चा सुरू होते आणि लगेच “याला अटक करा”चा नारा दिला जातो! काहींना तर आता वाटू लागलंय की पोलिसांनी वेगळंच “धर्मनिहाय अटक शेड्यूल” काढावं की काय? पण गंमत अशी की, जे लोक शांततेचा संदेश देतात, तेच कधी कधी वादाच्या पेट्रोलमध्ये थेंब टाकताना दिसतात. त्यामुळे सामान्य माणूस मात्र डोकं खाजवत बसलाय “आपण रोजच्या आयुष्यात जगायचं की रोज नवा वाद समजून घ्यायचा?” हा वाद खरंच धार्मिक आहे, की निवडणुकीच्या आधीचा ‘ट्रेलर’ आहे? काही जण तर मिश्कीलपणे म्हणतायत, वाद थांबला तर काहींचे राजकारणच थांबेल की काय! एकंदरीत, लोकांची साधी मागणी आहे “धर्म आपापल्या जागी ठेवा आणि शांतता थोडी पुढे आणा!” पण ही मागणी ऐकणाऱ्यांपर्यंत पोहोचतेय की नाही, हा खरा प्रश्न अजूनही ‘अनुत्तरित’च आहे.∙∙∙

पाणी नव्हे, माणसांची उणीव!

केपेमध्ये बंद पडलेल्या जलतरण तलावाची अखेर आठवण झाली, तीही तब्बल जवळपास वर्षभरानंतर! आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी ‘प्रत्यक्ष पाहणी’ केल्यावरच प्रशासनाला डोळे उघडले, हेच या कहाणीचं खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल. १५ जुलै २०२५ पासून कर्मचारी नाहीत म्हणून कुलूप ठोकलेला तलाव म्हणजे पाणी कमी नव्हतं, पण माणसं कमी होती! स्थानिक नागरिक, विद्यार्थी ओरडत होते, पण आवाज बहुतेक पाण्यातच विरघळत होता. आता मात्र ‘समन्वय’ साधून चार नवीन कर्मचारी मंजूर झालेत म्हणे तेही सोमवारी रुजू होणार! म्हणजे एवढ्या महिन्यांत प्रश्न सुटला नाही, पण एका भेटीत जादू झाली, असं चित्र उभं राहतं. केपेमधील हा ‘स्विमिंग पूल’ आता पोहण्यासाठी नव्हे, तर प्रशासनाच्या गतीचा अंदाज घेण्यासाठीच उपयोगी पडतोय! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज : कोणी विद्यार्थी देता का ?

मिस इंडिया साध्वीचा अभिमान!

‘कूपमंडूक’ या शब्दांत अनुचित वृत्तीचा खोल अर्थ भरला आहे. आपल्या समाजात अशा कूपमंडूक वृत्तीचे लोक असतात. साध्वी सैल या वास्को शहरात जन्मलेल्या मुलीला देशातील सौंदर्यवतीचा मिस इंडिया खिताब मिळाला आहे. आता ही मुलगी भारताला मिस वर्ल्डसाठी प्रतिनिधित्व करणार आहे. स्वतःला गोमंतकीय म्हणविणाऱ्या व गोव्यात जन्मलेली मुलगी मिस इंडिया बनते, याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा होता. मात्र काही लोक साध्वी गोमंतकीय नसल्याचे सांगून सोशल मीडियावर तिला ट्रोल करायला लागले आहेत. सचिन तेंडुलकर यांचा मुलगा गोमंतकीय होणे, आपण स्वीकारतो. मग गोव्यात जन्माला आल्याचा दावा करणारी व आपण गोमंतकीय असल्याचे अभिमानाने सांगणारी साध्वी सैल परकी कशी झाली. साध्वी सैल ही मराठा समाजातील असून राज्यातील कोकण मराठा समाजाबरोबरच गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाने साध्वीचे तोंड भरून कौतुक केले असून मराठा समाजाने साध्वीबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. मराठा समाजाने साध्वी सैल हिला मिस वर्ल्डसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. ∙∙∙

पर्वरीतील वाहतूक कोंडी

राज्याच्या कुठल्याही भागातून दुसऱ्या भागात निश्चितपणे पोचता येते. सध्या विवाह सोहळे सुरु आहेत. त्यामुळे मुर्हुतावर पोचणे आवश्यक असते. पर्वरीत सध्या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. तो लवकरच पूर्ण होईल, अशी गोड बातमी प्रसारित झाल्यास २४ तास होण्याआधीच शनिवारी पर्वरीत जबरदस्त वाहतूक कोंडी झाली. मुहूर्तावर पोचण्यासाठी निघालेले वरातीवेळी पोचले. पणजीहून म्हापशाच्या दिशेने जाणारे तासभर तर म्हापशाहून पणजीकडे येणारे दोनेक तास या कोंडीत अडकले होते. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: गोव्यात भाजपाला पर्याय उभा राहणार का ?

गॅस सिलिंडरचा काळा बाजार 

व्यावसायिक  गॅस  सिलिंडरचे  दर वाढल्याने सिलिंडरचा काळाबाजार सुरु झाला आहे. मडगावात कालपर्यंत ब्लॅक मार्केटमध्ये व्यावसायिक   सिलिंडर  चार हजार  रुपयांना मिळत होता. आता त्यात चक्क एक हजारांनी वाढ केली आहे. काळ्याबाजारात त्याचे दर पाच हजार रुपये झाले आहे. बहुतेक हॉटेलवाल्यांकडे  दोन सिलिंडर  असले  तरी ते पुरत नाहीत. पूर्वी घरगुती सिलिंडर ही हे हॉटेलवाले वापरत होते. नागरीपुरवठा  खात्याकडून छापा टाकण्याचा  धोका लक्षात आल्याने घरगुती सिलिंडर मिळणे बंद झाले, पण धंदा तर करायला हवाच, त्यासाठी काळ्याबाजारातून सिलिंडर मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली. त्यामुळे बाजारात काळाबाजाराला ऊत आला आहे. ∙∙∙

...नेटवर्क अपडेट होणार?

एका बाजूला मुख्यमंत्री विकासाच्या गप्पा रंगवत आहेत आणि डिजिटल गोवा, स्मार्ट गोवा, पायाभूत सुविधा यावर नारा देतात. मोबाईलवर ॲप्स वाढत असून योजना ऑनलाइन होत आहेत आणि भाषणांमध्ये गोवा थेट ‘फ्युचर मोड’मध्ये पोहोचलाय! पण दुसऱ्या बाजूला जमिनीवर काही वेगळंच ‘अपडेट’ चालू आहे. धार्मिक वादांचे नोटिफिकेशन सतत पॉप-अप होतंय. त्यामुळे सामान्य माणूस थोडा कन्फ्यूजच झालाय, आपण ५ जी स्पीडने पुढे जातोय, की जुन्याच वादांच्या ‘बफरिंग’मध्ये अडकलोय? सरकार म्हणतंय डिजिटल व्हा, पण लोक अजूनही भावना ‘ऑफलाइन’ मोडमध्ये अपडेट करतायत! काहीजण तर मिश्कीलपणे म्हणतायत, रोड, ब्रिज आणि ॲप्स तयार झाले ठिक आहे. पण मनाचे नेटवर्क कधी कनेक्ट होणार? एकंदरीत प्रश्न साधाच आहे, विकासाच्या ‘डॅशबोर्ड’वर सगळं हिरवं दिसत असताना समाजात लाल दिवे का लागलेत? आता या ‘डबल स्क्रीन’चं स्पष्टीकरण कोण देणार? याचीच लोक उत्सुकतेने वाट पाहतायत! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: मंत्र्यांच्या खुर्चीचीच चर्चा!

अन् कॅमेरा फेम भलत्यांचेच!

गोवा पोलिसांनी अखेर त्या अट्टल बांगलादेशी दरोडेखोरांना शिताफीने बेड्या ठोकून गोव्यात आणले खरे; पण आता खरा प्रवास सुरू होतोय, तो म्हणजे लुटलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचा. या संपूर्ण तपासाचे श्रेय जाते, त्या एका वरिष्ठ पोलिस आयपीएस अधिकाऱ्याला, ज्यांनी हे प्रकरण मनावर घेऊन त्याचा सलग पाठपुरावा केला. यात म्हापसा पोलिसांचा वाटा, तर सिंहाचा राहिला, कारण त्यांनी शोधून काढलेली ती एक खास टीप. याच जोरावर दरोडेखोरांच्या मुसक्या आवळणे शक्य झाले. मात्र, या यशाचा क्लायमॅक्स कालच्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळाला. ज्यांनी ग्राउंडवर घाम गाळला, ते अधिकारी कुठेतरी मागेच होते; पण ज्यांनी या केसमध्ये साधी काडीही हलवली नाही, ते काही ‘स्वयंघोषित’ बडे साहेब मात्र पहिल्या रांगेत छाती काढून फोटोसाठी पोझ देत होते. खरेच, पोलिस दलात काम करणाऱ्याला कामाची पोचपावती मिळण्यापेक्षा, कानामागून येऊन भाव खाऊन जाणाऱ्यांचीच संख्या सध्या वाढताना दिसते. ∙∙∙

येते दया, जाते रया!

सरकारचे सिव्हिल सर्विसीस रूल्स म्हणजे सेवा नियम असूनही अधिकारी मोकाट बेछूट विधाने व टीका करत सुटतात, तेव्हा त्याला जाब विचारायचा अधिकार कार्यालयाला असतो. सरकारच जेव्हा दोषींना शासन करायला पावले उचलत नाही, तेव्हा ही दया कला अकादमीची रया घालवते. लांच प्रकरणामुळे दिवसेंदिवस कला अकादमीची नैतिक विश्वासाची चकाकी खरवडून जात आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा परिणाम फारसा होणार नाही. मध्यंतरी, कोकणी अकादमीने तीन दिवसांचे नाट्य लेखन शिबिर घेतले, तसेच कला अकादमीने घेतले तर फायदा होईल. वाहवत चाललेल्या, साहित्यचौर्याला कवटाळून चाललेल्या नाट्य क्षेत्राच्या जहाजाला दिशा मिळेल हे खचित. पुढच्या वर्षी चौर्यविरहीत कोकणी संहिता कार्यशाळेमुळे मिळतील, अशी भाबडी आशा कोकणीवादी बाळगून आहेत, हा तसा विनोदच! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: मंत्र्यांच्या खुर्चीचीच चर्चा!

कोकणी शिक्षणाची स्थिती

दहावीला तिसरी भाषा कोकणी विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा घरंगळत आहे. मध्यंतरी फोंडा तालुक्यात काही शाळांतून उत्तम शिक्षिका होत्या. त्यांना कोकणीचे, अध्यापनाचे प्रेम होते. त्या निवृत्त झाल्यावर व्यवस्थापनाने तो विषयच बंद करून टाकला. डोक्याला कंत्राटी शिक्षक आणायचा ताप नको म्हणून असेल. काही स्कूलमध्ये पीटी शिक्षकांना कोकणी विषय शिकवायला भाग पाडलंय. तरी बरं, या शिक्षकांना काळ-वेग-अंतर ही गणितीय समीकरणे व त्रिकोणमिती शिकवायला अजून तरी सांगितले नाही. काही शाळांतून प्रयोगशाळा साहाय्यक कोकणी शिकवत होते. आता तो हुद्दाच नाही. कैक ठिकाणी प्रयोगशाळाच नाही, विज्ञान कसं समजतं, देव जाणे. दरम्यान मोठमोठ्या घोषणा कोकणीसाठी चालू आहेत. पण दुरवस्थेचे हे चित्र सुधारायला फारसे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत नाही. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: काँग्रेस आमदार गेले कुठे?

शेर आया शेर!

सेंट फ्रांसिस झेवियर विषयी आक्षेपार्ह विधान केल्यावरून कोठडी मिळालेल्या गौतम खट्टर याने कोठडीतून सुटताच धर्माचा विजय असो, अधर्माचा पराजय होवो, असे म्हटले आहे. जामीन मिळाल्यावर खट्टर कोठडीतून बाहेर येणार हे समजताच त्याचे समर्थन करणारे मोठ्या संख्येने तेथे जमा झाले होते. त्यांनी देखो देखो कौन आया, शेर आया, शेर आया अशा घोषणा दिल्या. यावरून खट्टर यांच्या विधानाचे समर्थन करणारे राज्यात आहेत, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तबच झाले आहे. ∙∙∙

परशुराम भक्तांना वॉरनचे आव्हान?

गोव्यात गोंयचो सायब कोण? यावरून वाद-विवाद सुरू झाला आहे. काही हिंदू स्वतःच्या रक्तात स्पेनहून आलेल्या ख्रिस्ती धर्मगुरूचे डीएनए असल्याचे सांगतात, तर काही जण परशुरामाने बाण मारून गोवा निर्माण दावा करतात. आता परशुरामाने बाण मारून निर्माण केलेल्या बाणावलीत सनातनीना बंदी घालण्याची धमकी चर्चिल आलेमाव यांचे पुतणे वॉरन आलेमाव यांनी दिली आहे. सनातनी बाणावलीत नकोत, त्यांना बंदी घाला, अशी मागणी आलेमाव पोलिस अधिकाऱ्याकडे करतात. सनातनी पोलिस निरीक्षक आलेमाव यांची धमकी ऐकून घेतात. परशुरामाने बाण मारून निर्माण केलेल्या बाणावलीत परशुराम भक्तानाच बंदी? आलेमाव यांची धमकी ऐकून आता परशुराम भक्त आधुनिक परशू बाहेर काढणार का? एक मात्र खरे बाणवली असो किंवा वार्का असो कोणालाही बंदी घालायला ते गाव त्यांच्या वडिलांचे ‘फात’ नाहीत. ∙∙∙

स्थानिक विक्रेत्यांचा घोर अपमान!

गोवा मनोरंजन संस्थेच्यावतीने तीन दिवसीय पुरुमेताच्या फेस्तला काल (शुक्रवार)पासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुरुमेताच्या फेस्तचे उद्‍घाटन झाले. पुरुमेताचे फेस्त पाहिल्यानंतर खरोखरच तो हाच काय, असा प्रश्न अनेकांना नक्कीच पडला असणार आहे. काही वर्षांपूर्वी पुरुमेताचे फेस्त विविध शहरांतून भरायचे. पणजीचा विचार केला तर नॅशनल थिएटरजवळ रस्ते विक्रेत्यांच्या ठेल्यांनी भरून जायचे. विक्रेते पोत्यांनी माल घेऊन या फेस्तामध्ये दुकाने थाटत असत. परंतु सरकारने फेस्त आयोजित केलाय म्हटल्यावर असाच जुन्या पद्धतीचा आणि स्वस्त आणि स्थानिक उत्पादकांचा माल सहजपणे उपलब्ध होईल, असे वाटत होते. पण हा केवळ आभासच. विशेष बाब म्हणजे स्थानिक विक्रेत्यांना एका छत्रीखाली दुकाने थाटण्याची केलेली व्यवस्था म्हणजे एखाद्या चित्रपटासाठी सेट उभा केला आहे की काय असे वाटत होते. अखेर मनोरंजन संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या डोक्यातून आलेली ही कल्पना. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: युरींचा प्लॅन फसला?

सरकार मूग गिळूच गप्‍पच बसणार?

सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍याबाबत आक्षेपार्ह विधाने करीत गौतम खट्टर याने जगभरात प्रसिद्ध असलेल्‍या गोव्‍यातील धार्मिक सलोख्‍याला हात घातला. सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍या गोव्‍यासह जगभरातील भाविकांनी त्‍याच्‍या वक्तव्‍यांचा जाहीर निषेध नोंदवला. परंतु, हिंदुत्‍ववादी संघटनांनी मात्र त्‍याला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. शनिवारी खट्टरची जामिनावर मुक्तता झाल्‍यानंतर याच कार्यकर्त्यांनी त्‍याला ‘सिंहा’चीही उपमा दिली. त्‍यामुळे यापुढे बाहेरून कुणीही येऊन राज्‍यातील धार्मिक वातावरण बिघडवण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यास आणि अशा संघटनांकडून त्‍यांना पाठिंबा मिळत राहिल्‍यास राज्‍य सरकार मूग गिळून गप्‍पच बसणार का? असा सवाल सर्वसामान्‍यांकडून विचारला जात आहे. ∙∙∙

गोव्यातील अजीब सिच्युएशन !

बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांना अधून मधून हिंदी शब्द झाडण्याची हुक्की येते. त्यांचे विधानसभे बाहेरचे ‘अरे ओ सांबा!’ हे वाक्य बरेच गाजले होते. अगदी चर्चिल आलेमाव यांनाही या वाक्याने भुरळ घातली. आता धारबांदोडा जंगलात मेलेला वाघ सापडल्याने व्हिएगस यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना हा वाघ मेला की कुणी मारला असा सवाल करताना, याची चौकशी कोण करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. वेंझी म्हणतात, गोवा सरकारला वाघ संरक्षित क्षेत्र जाहीर करण्यात कोणतेही स्वारस्य नाही. ते म्हणतात, अजीब सिच्युएशन मे है हम! वेंझीच्या या हिंदी वाक्याची तरी सरकार दखल घेणार का? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: काँग्रेसचा सावळा गोंधळ

मेडल ऑफ हॉनर!

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना इतर आमदार व आझाद मैदान ते दोनापावल मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांसारखेच पणजी पोलिस स्थानकात काही दिवसांमागे चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले होते. परंतु, विरोधी पक्षनेत्यांनी म्हणे आपल्या खास दूतांमार्फत संदेश पाठवून काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कुंकळ्ळीतील कार्यकर्त्यांना त्या दिवशी पणजीत बोलावून घेतले होते. एरव्ही कधी अटकेचा अनुभव न घेतलेल्या युरींना कदाचीत आपणास अटक झाली, तर पुढची तयारी म्हणून खबरदारी घेतली असावी. परंतु, अवघ्या वीस मिनिटांत ते जबाब नोंदवून बाहेर आले व त्यांनी पोलिसांचे समन्स म्हणजे ‘मेडल ऑफ हॉनर'' असे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. त्यानंतर परवा गोव्यातील सीबीआयचे एसपी आशिष कुमार यांनी पत्रकारांना मागच्या पाच वर्षात त्यांच्याकडे एकही तक्रार दाखल न झाल्याचे स्पष्ट केले. नेमका हाच धागा पकडून, कुंकळ्ळीत एक पोस्टर व्हायरल झाले. त्यात विरोधी पक्षनेते म्हणून चार वर्षे कारभार सांभाळताना युरींनी एकही तक्रार दाखल केली नाही म्हणून त्यांचे खोचकपणे अभिनंदन करून, ही कामगिरी म्हणजे ‘मेडल ऑफ हॉनर''च असल्याचा टोला एका कुंकळ्ळीकराने हाणला आहे व तो गोव्यातच नव्हे विदेशातही गोमतकीयांमध्ये बराच व्हायरल झाल्याचे कळते. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com