
पणजी: नद्या सगळीकडेच वाहतात. नद्यांच्या काठी पूर्वीच्या काळी संस्कृती उदयाला आली असेही सांगण्यात येते. इतर ठिकाणच्या नद्या आणि गोव्यातील नद्या यांच्यात मोठा फरक आहे. राज्यातील बहुतांश नद्या या निमखाऱ्या पाण्याच्या आणि बारमाही वाहणाऱ्या आहेत.
या नद्यांच्या काठावर खाजन शेती वर्षानुवर्षे विकसित होती. भरती ओहोटीवेळी स्वयंचलितपणे उघडबंद होणारे दरवाजे असणाऱ्या मानशींच्या रुपाने मासेमारीसाठी खास व्यवस्था आकाराला आली. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांइतकीच नद्यांच्या काठावरील खाजन शेती ही राज्याच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे.
हजारो वर्षांचा वारसा असलेली ही शेतीपद्धती आजही ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यावरणीय संतुलनआणि सांस्कृतिक जीवन यासाठी महत्त्वाची मानली जाते. समुद्राला लागून असलेल्या नदीमुख भागात खारपाणी घुसत असल्यामुळे शेती करणे अवघड होते.
मात्र, शतकानुशतकांपूर्वी शेतकऱ्यांनी बांध घालून, पाटबांधणी करून आणि कालवे खोदून ही जमीन शेतीयोग्य बनवली. या कामासाठी स्थापन झालेल्या खाजनी समाजामुळे बंधाऱ्यांची देखभाल, पाणी नियंत्रण आणि पिकांचे संरक्षण हे कार्य सामूहिक पद्धतीने पार पडले.
गेल्या काही दश कांत खाजन शेती अडचणीत सापडली आहे. शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन बांधकामासाठी वळवली जात आहे. बंधाऱ्यांची देखभाल कमी झाल्याने खारपाणी घुसखोरी वाढते. औद्योगिक सांडपाणी आणि प्रदूषणामुळे जमिनीची सुपीकता घटत आहे. मजुरांची टंचाई असल्यामुळे अनेक शेतं पडीक पडली आहेत.
विशेषज्ञांच्या मते, खाजन शेती केवळ शेती न राहता पर्यावरणपूरक पर्यटन, शैक्षणिक अभ्यास आणि ग्रामीण विकासासाठी वापरली जाऊ शकते. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर या परंपरेची माहिती दिल्यास पुढील पिढीला तिचे महत्त्व कळेल.
खाजन शेती म्हणजे खारपाण्याशी केलेला संघर्ष, श्रमाची ताकद आणि परंपरेचा वारसा. तिचे संवर्धन झाले तर गोव्याच्या ग्रामीण भागाला नवे जीवन मिळेल आणि पर्यावरणाचे रक्षणही होईल. म्हणूनच खाजन शेती जपणे ही केवळ शेतकऱ्यांची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.
खाजन जमिनीत मुख्यत्वे भात पिक घेतले जाते. या भाताला टिकाऊपणा आणि पौष्टिकता लाभलेली आहे. याशिवाय हंगामी मासेमारी आणि कोळंबी संवर्धनातून शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळतो. भात आणि मत्स्यव्यवसाय यांच्या संगमामुळे ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना रोजगार मिळत आला आहे. खाजन शेतीमुळे उभारलेली अर्थव्यवस्था गावांच्या सामाजिक जीवनाशी घट्ट जोडलेली आहे. सण, उत्सव आणि धार्मिक विधींमध्ये या जमिनीचा सहभाग दिसून येतो. त्यामुळे ही शेती केवळ उत्पादनाचे साधन नसून गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग बनली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.