

पणजी: कर्नाटकातील कळसा जलवाटप प्रकल्पामुळे म्हादई नदीच्या परिसंस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय वन व पर्यावरण विषयक अधिकारप्राप्त समितीने दिला आहे. या प्रकल्पामुळे गोव्यातील म्हादई अभयारण्यासह जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी स्पष्ट नोंद समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे.
समितीसमोर सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, कळसा प्रकल्पामुळे म्हादई नदीतील पाण्याचा प्रवाह लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम नदीवर अवलंबून असलेल्या जंगल परिसंस्थेवर, वन्यजिवांवर तसेच स्थानिक लोकांच्या पाणीपुरवठ्यावर होणार असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
विशेषतः गोव्यातील संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्रांमध्ये याचे दुष्परिणाम जाणवू शकतात, असे समितीचे मत आहे. कर्नाटक सरकारने या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे मंजुरी मागितली असली, तरी पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास न करता पुढे जाणे योग्य ठरणार नाही, असे समितीने सूचित केले आहे.
प्रकल्पामुळे आंतरराज्य जलविवाद अधिक तीव्र होण्याची शक्यता असून गोव्याच्या हितसंबंधांकडे दुर्लक्ष होता कामा नये, असेही नमूद करण्यात आले आहे.
गोवा सरकारने म्हादई नदी व तिच्या खोऱ्याचे संरक्षण करण्यासाठी आपली भूमिका पुन्हा एकदा ठामपणे मांडली असून, कोणत्याही परिस्थितीत म्हादईच्या पर्यावरणावर परिणाम होईल, असे प्रकल्प मान्य केले जाणार नाहीत, असा इशाराही दिला आहे. कळसा प्रकल्पाबाबत केंद्र सरकार कोणता निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.