सांगे येथील कार्ला गावात अद्यापही योग्य रस्ता नसल्याने स्थानिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. या गावात 100% लोक अनुसूचित जमातीचे आहेत आणि सुमारे 200 आणि त्याहून अधिक लोक इथे वास्तव्य करतात. मात्र गरजेच्या सुविधा नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
गावातील एखाद्याला जर किरकोळ सर्दी किंवा ताप आला, तरीही त्यांना केपे आरोग्य केंद्रात जाण्यासाठी तब्बल 35 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यात जर रात्री अशी आपत्ती आली तर समस्या अधिक गंभीर बनते.
काही दिवसांपूर्वी या गावातील पाईक गावकर नावाच्या एका व्यक्तीला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यामुळे लोकांनी रुग्णवाहिका बोलावली. मात्र रस्त्यामुळे रुग्णवाहिका गावापर्यंत नेणे शक्य नव्हते. त्यामुळे रुग्णवाहिका चालक व डॉक्टरांनी ग्रामस्थांना त्या व्यक्तीला कार्ला रस्त्याच्या वेशीवर आणण्यास सांगितले. गावकऱ्यांनी बांबूच्या काठ्या आणि घोंगडी वापरून 3 किमी पायी चालत त्यांना रुग्णवाहिकेजवळ नेले.
मात्र नादुरुस्त रस्त्यामुळे आणि यामध्ये अधिक वेळ गेल्याने पाईक गावकर यांचा श्वासोच्छ्वास थांबला आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. 'त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?' असा प्रश्न आता स्थानिक सरकारला विचारत आहेत.
जर रुग्णवाहिका तिथे वेळेवर पोहोचली असती तर गावकर यांचा जीव वाचला असता. सोबतच शालेय विद्यार्थ्यांनाही सकाळी या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. संध्याकाळी पालकांंना आपल्या मुलांना घरी सुरक्षितपणे घेऊन जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर त्यांची वाट पहावी लागते. कारण प्राण्यांचा तिथे वावर असल्याने त्यांच्या हल्ल्याची भीती असते. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी सरकारकडे केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.