

डिचोली: तब्बल १६१ दिवस सुरू असलेले कारापूर येथील वादग्रस्त ‘वन गोवा’ या लोढा ग्रुपच्या मेगा निवासी प्रकल्पाविरोधातील आंदोलन अखेर मागे घेण्यात आले.
सरकारच्या हस्तक्षेपानंतर काम बंद करण्याची आदेशवजा नोटीस कारापूर-सर्वण पंचायतीने संबंधित प्रकल्पाला बजावली आहे. त्यामुळे शनिवारी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कारापूरवासीयांनी घेतला.
गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, खासदार विरियातो फर्नांडिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शनिवारी आंदोलनस्थळी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. स्वप्नील सालेलकर यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.
आंदोलन मागे घेण्यात येत असले, तरी वादग्रस्त प्रकल्पाविरोधातील न्यायालयीन लढा सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. प्रकल्पाला नोटीस बजावल्याने कारापूरच्या लोकांना, विशेषतः महिलांना, चतुर्थीच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकल्पाविरोधातील लढा पूर्णपणे यशस्वी झाला नसला, तरी पंचायतीचा निर्णय आंदोलनकर्त्यांसाठी दिलासादायक आहे.
हा महिलांचा विजय आहे, असे आंदोलनाचे प्रमुख डॉ. स्वप्नील सालेलकर, ॲड. अजय प्रभूगावकर आणि स्वप्नेश शेर्लेकर आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. वादग्रस्त प्रकल्पस्थळी असलेल्या पारंपरिक पायवाटांचा गुंता यापूर्वीच सुटला आहे. धरणे आंदोलन मागे घेण्यात येत असले, तरी प्रकल्प हद्दपार व्हावा यासाठी न्यायालयीन लढा सुरूच राहणार असल्याचे सालेलकर यांनी स्पष्ट केले
५ एप्रिलपासून संघर्ष
वादग्रस्त मेगा प्रकल्प गावात नकोच, अशी मागणी करीत कारापूरवासीय पाच महिन्यांपूर्वी रस्त्यावर उतरले होते. गेल्या ५ एप्रिलपासून गावातील देवी श्री शांतादुर्गेच्या मंदिराजवळ धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.