Goa Politics: खरी कुजबुज; कर्नाटकातील विद्यार्थी कोकणीत अव्वल!

Khari Kujbuj Political Satire: संयुक्त वीज नियामक आयोगासमोर झालेल्‍या जन सुनावणीच्या निमित्ताने वीज खाते लक्ष्य झाले आहे. हे खाते थकबाकी वसूल करत नाही.
Goa Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटकातील विद्यार्थी कोकणीत अव्वल!

कोकणी मराठीचा वाद अजून संपलेला नाही. मराठीला कोकणीच्या बरोबरीने हक्क मिळावेत, म्हणून मराठीप्रेमी मेळावे घेत आहेत. काही मुजोर कोकणीप्रेमी ज्यांना मराठी हवी त्यांनी महाराष्ट्रात जावे, अशी मुक्ताफळे उधळत आहेत. गोव्यात कोकणी दुसरी भाषा म्हणून माध्यमिक स्तरावर शिकवली जाते. दहावीच्या परीक्षेत आजपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शंभरपैकी शंभर गुण मिळालेले नाहीत. मात्र, यांच्या कर्नाटक बोर्ड परीक्षेत दहावीच्या परीक्षेत पाच विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळवून गोव्या पेक्षा कर्नाटकातील विद्यार्थी हुशार आहेत हे दाखवून दिले आहेत. आता या विद्यार्थ्यांना जर कर्नाटकातील कन्नड प्रेमींनी कोकणी हवी असेल तर गोव्यात जा, असे म्हटले तर आपल्या कोकणी मोगींना आवडणार का? काही का असेना गोव्यातील कोकणी मोगीनी कर्नाटकाकडून कोकणी शिकण्याची वेळ आलीय. ∙∙∙

वीज खाते लक्ष्य

संयुक्त वीज नियामक आयोगासमोर झालेल्‍या जन सुनावणीच्या निमित्ताने वीज खाते लक्ष्य झाले आहे. हे खाते थकबाकी वसूल करत नाही. केबलवाल्यांकडून येणे असलेली बाकी कित्येक वर्षे वसूलच केली नव्हती. वीज पुरवठा सुरळीत नाही. औद्योगिकीकरणात विजेची अनुलब्धता अशी अनेक कारणे खात्यावरील टीकेसाठी पुढे केली जात आहेत. देशातील स्वस्त वीज आम्हीच देतो असे सांगून सरकारने याआधी आपली पाठ थोपटून घेतली होती. मोफत पाणी योजना गुंडाळल्यानंतर आता वीज दरवाढ केली जात असल्याने जनतेत एक चीड आहे. त्याचे प्रतिबिंब जनसुनावणीत पडले आहे. आता दरवाढ आयोगाने सुचवली आणि सरकारने ती लागू केली तर जनक्षोभास सामोरे जावे लागणार हे ठरून गेले आहे. ∙∙∙

केजरीवालांचा रद्द दौरा

‘आप’चे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गोव्याच्या दौऱ्यावर येणार होते. ते शिरगाव येथे भेट देणार म्हणून मोठी उत्सुकता काहींना होती. भंडारी समाजाचा मुख्यमंत्री करू, असे ‘आप’ने जाहीर केल्यापासून काही जणांना त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण झाली आहे. भंडारी समाजाचे नेते उपेंद्र गावकर यांनी ‘आप’ला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही ती घटलेली नाही. त्यामुळे शिरगावला केजरीवाल येणार ही त्यांच्यासाठी मोठी घटना ठरणार होती. त्यांचा दौरा रद्द झाल्याचे शुक्रवारी समजल्यावर हिरमोड झाला. त्यामुळे आताच भारत पाकिस्तान तणाव निर्माण व्हायला हवा होता का, अशी विचारणा ते खासगीत करू लागलेत. ∙∙∙

खोदलेले हे रस्ते दुरुस्त कधी होणार?

स्मार्ट सिटीसाठी खणलेले पणजीतील रस्ते येत्या वीस मेपर्यंत दुरुस्त केले जातील, असे स्पष्टीकरण स्मार्ट सिटीच्या ‘सीईओ’नी केले आहे. त्यामुळे राजधानीतील रहिवाशांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. कारण गेली तीन चार वर्षे त्यांना तेथील रस्त्यांच्या दुर्दशेचा त्रास सहन करावा लागला आहे. पण आता प्रश्‍न राजधानी पणजीचा नाही तर राज्यांतील अन्य भागांत खोदलेल्या व अजून खोदल्या जात असलेल्या रस्त्यांचा आहे. कारण आता मे महिन्याचा पहिला आठवडा उलटलेला आहे व त्यामुळे हे रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त होतील का अशी शंका लोकांना येऊ लागलेली आहे. मडगाव व फातोर्डा तसेच नावेली मतदारसंघाच्या काही भागात भवीजवाहिनी, मलनिस्सारण व गॅस वाहिनी यासाठी अजून रस्ते खोदण्याचे काम सुरु आहे व ते रस्ते पूर्ववत कधी केले जातील, ते सांगण्याची कोणाचीच तयारी नाही त्यामुळे पावसाळ्यात गंभीर समस्या नक्की आहे. ∙∙∙

Goa Political Updates
Khari KujbujDainik Gomantak

‘मेगा मार्ट-मॉल’ना परवाने मिळतात तरी कसे?

गोव्याच्या प्रमख शहरांत मेगा मार्ट-मॅाल संस्कृती जोर पकडू लागली आहे. बदलत्या जीवनशैलीला जरी ते अनुरुप असले तरी या संस्कृतीमुळे वाहन पार्किंगची समस्या निर्माण होऊ लागल्याचे वाहतूक पोलिसांचे मत आहे. या मेगा मार्टच्या परवानगी वरून एका नगरपालिका बैठकीत एका नगरसेवकानेच आवाज उठवला आहे. पण मडगावात म्हणे एकामागोमाग एकेक मॅाल तयार होत आहेत. पण त्यांच्या परवानगीचा आवाज उठत नाही वा संबंधित त्याकडे डोळेझाक करत असावेत. कारण अळी मिळी गुप चूप चिळी असा प्रकार असावा असे बोलले जाते.जुने कॅालेज,घोगळ, रावणफोंड या भागातील अशा मॅालांची कोणतीच पार्किंग व्यवस्था नाही त्यामुळे मुख्य रस्त्यावर ग्राहक पाहने पार्क करतात व त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो पण नगरपालिकेला त्याचे काहीच पडून गेलेले नाही, असे दिसते. त्यामुळे वाहतूक पोलिसही आपल्याला काय त्याचे, असे म्हणत असावेत. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; ‘स्मार्ट बस’ अचानक गायब!

फक्‍त एक महिन्‍याची मुदत

मडगाव पालिकेने कालपासून आपली वेबसाईट सुरू केली असून मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी तिचे उद्‍घाटन केले. मडगाव पालिकेने अशी वेबसाईट सुरू केल्‍यामुळे दिगंबर कामत यांनी मडगाव पालिका मंडळाचे कौतुक केले. मात्र ही वेबसाईट फक्‍त शोभेपुरती असू नये तर ती लोकांना सेवा देण्‍यासाठी तत्‍पर असावी, असेही बोलून दाखविले. लोकांना पालिकेकडून मिळणाऱ्या सर्व सेवा या वेबसाईटद्वारे उपलब्‍ध झाल्‍या पाहिजेत, असे सांगून तुम्‍हाला मी एक महिन्‍याची मुदत देतो, एका महिन्‍यात या सर्व सेवा लोकांना उपलब्‍ध करुन द्या, असे कामत यांनी सांगितले. यापूर्वी दिगंबर कामत यांनी आपल्‍या वाढदिवसाच्‍या कार्यक्रमात बोलताना, पालिका मंडळाला एक एप्रिलपासून कामाला लागा, असा आदेश दिला होता. आता एका महिन्‍यात लोकांना वेबसाईटवर सेवा उपलब्‍ध करून द्या, असे म्‍हटले आहे. कामत यांना आपल्‍याच या नगरपालिका मंडळावर फारसा विश्‍वास नाही की काय? परत परत त्‍यांना, असे अल्‍टीमेटम द्यावे लागतात,पण का बरे? ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; ‘स्मार्ट बस’ अचानक गायब!

मंत्र्यांच्या ‘ओएसडी’ची घरवापसी

पणजीचे आमदार व महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या ओएसडी म्हणून काम करणाऱ्या निधी सय्यद यांच्याशिवाय मोन्सेरात यांचे कोणतेच पान हलत नव्हते. कोणतीही गोष्ट त्यांच्याकडे घेऊन गेल्यास ‘टॉक टू निधी’ असे वाक्य त्यांच्या तोंडी वारंवार ऐकण्यात आले आहे. त्यामुळे या ओएसडीच्या हाती महसूल खात्याचा व्यवहार होता. त्यामुळे या खात्याच्या सर्वच अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत होती. तसेच त्यांना वाईट वागणूक द्यायची. तरीही मंत्री त्याकडे दुर्लक्ष करायचे. असे काय गुपित होते की, मंत्रीही तिची पाठराखण करत होते, अशी चर्चा तेव्हा रंगली होती. काही महिन्यापूर्वी माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी महसूल खात्यातील लाचखोरीचा आरोप केला होता. तेव्हा सर्वांच्या नजरा मंत्र्यांच्या ओएसडीकडे वळल्या होत्या. हे प्रकरण शेकणार , असे वाटल्याने मंत्री मोन्सेरात यांनी तिलाच मुख्यमंत्र्यांसमोर उभे केले व त्यानंतर तिच्याकडील व्यवहार काढून घेण्यात आला होता. आता तर महसूलमंत्र्यांनी निधीची शिफारस ती कामाला असलेल्या ताळगावातील सेंट मायकल हायर सेकंडरी स्कूलमध्ये केली आहे. हे स्कूलही मोन्सेरात चालवत आहेत. निधीला मात्र, मडकईकर प्रकरण शेकल्याने घरवापसी करावी लागली. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com