Goa Politics: खरी कुजबुज; सोने चोरणारा माकड?

Khari Kujbuj Political Satire: कोलवा हा एरवी सदैव जागृत रहाणारा भाग. तेथे पर्यावरणाच्या रक्षणासाठी नेहमीच दक्ष असलेल्या बिगर सरकारी संघटनाही कार्यरत आहेत.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

सोने चोरणारा माकड?

ऐकावे ते अजबच, असे म्हणतात ते खरे. कधी कधी अफवा जास्त पसरली तर ते लोकांना सत्य वाटते. कुंकळ्ळी पालिका क्षेत्रातील गुळ्याकोटो या गावात म्हणे सोने चोर माकडाने धुमाकूळ घातला होता. गावात एक माकड धुमाकूळ घालतो, घरात घुसून किंमती वस्तू लंपास करतो.एवढेच नव्हे त्या माकडाने एका घरात घुसून सोन्याचे मंगळसूत्र पळविले, अशी तक्रार स्थानिकांनी केली होती. आतापर्यंत आंबे, फळे व केळी चोरणारे माकड आपण पाहिले होते. गावात सोने चोरणारे माकड आहे. म्हटल्यावर पोलिसांची बोबडीच वळली. कोणी तरी या माकडाला चोरीचे प्रशिक्षण दिल्याची चर्चा गावात पसरली. शेवटी काही दिवसांपूर्वी या माकडाला वन खात्याने पकडले. मात्र त्याच्याकडून सोने मात्र सापडले नाही. अजब हा सोने चोरणारा माकड नाही का? आता खरोखरच माकडाने मंगळसूत्र चोरले की नाही? हे सांगणार कोण? ∙∙∙

कोलवा खाडीची दुर्दशा

कोलवा हा एरवी सदैव जागृत रहाणारा भाग. तेथे पर्यावरणाच्या रक्षणासाठी नेहमीच दक्ष असलेल्या बिगर सरकारी संघटनाही कार्यरत आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जगप्रसिध्द अशा या समुद्रकिनाऱ्याला भिडून असलेल्या तेथील कोलवा खाडीचे भाग्य काही गेली अनेक दशके पालटलेले नाही. सध्या पर्यटक हंगाम ऐन भरात आहे व ही खाडी मात्र कच-याने भरल्याच्या तक्रारी होत आहेत. समाजमाध्यमांवर त्या बाबत छायाचित्रांसह चर्चा चालू आहे. काहीजण ही खाडी स्वच्छ करण्याची व ती तशीच राखण्याची जबाबदारी कोणावर असा सवालही करतात. तर काही जण जलस्त्रोत व पर्यटन खाते काय करते, अशी विचारणाही करताना आढळत आहेत. सरकारने पर्यटन किनारे स्वच्छ राखण्यासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीकडे हे काम का देऊ नये, असा मुद्दाही त्यातून निर्माण झाला आहे खरा.∙∙∙

विद्यार्थ्यांना ‘नीट’ गेली जड!

जेवढी परीक्षा अवघड, तेवढे विद्यार्थी ‘हुशार’, असा गैरसमज आपल्या शिक्षणतज्ज्ञांनी करून घेतला असावा. परीक्षेचा ताण सहन होत नाही, म्हणून अनेक विद्यार्थी परीक्षेपेक्षा आपल्या जीवनाचीच परीक्षा संपवितात. गोव्यातील बिट्स पिलानी संस्थेत पाच महिन्यात तीन विद्यार्थ्यांनी जीवन संपवले. गेल्या रविवारी ‘नीट’ चाचणी झाली. यंदाची ‘नीट’ परीक्षा बरीच कठीण होती, असा दावा हुशार विद्यार्थ्यांनी केला आहे. ‘नीट’ परीक्षेत भौतिक शास्त्राचा पेपर तर एवढा अवघड होता, ‘आयआयटी’ चे विद्यार्थी हा पेपर सोडवू शकले नसते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. वैद्यकीय शास्त्र शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी दिवस रात्र एक करून शिकलेले विद्यार्थी परीक्षा केंद्रातून बाहेर पडताच परीक्षा चांगली गेली नाही, म्हणून रस्त्यावरच. ओक्साबोक्सी रडताना दिसत होते. हे चित्र केवळ गोव्याच्या नव्हे तर संपूर्ण देशातील ‘नीट’ परीक्षाकेंद्राबाहेर असेच चित्र दिसत होते. ‘नॅशनल टेस्टिंग अथॉरिटी’ या संस्थे तर्फे ‘नीट’ परीक्षा घेतली जाते. महत्वाचे म्हणजे यंदाचा ‘नीट’ परीक्षेचा भौतिक शास्त्राचा पेपर शिक्षक ही सोडवू शकले नाहीत. विद्यार्थी विचारतात, जे माहीत नाही, ते का विचारता? ∙∙∙

कंत्राटदाराला कोण विचारणार?

वेर्ण्यात बस खासगी उलटून कंडक्टर जागीच ठार झाला. या अपघाताला क्षमतेहून अधिक प्रवाशी, चालकाची बेपर्वाई, अन् रस्त्याची खोदलेली स्थिती, अशा अनेकांचा कारणांचा पाढाच अपघातस्थळी उपस्थितांनी वाचला. नंतर आता दोन दिवस वाहतूक पोलिस, आरटीओ यांचा देखावा सुरू होईल. काहीतरी थातुरमातुर कारवाई होईल. त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रस्ता रुंदीकरण, उड्डाण पुलाच्या नावाखाली खोदलेले रस्ते काम झाल्यावर निदान तात्पुरती त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु कंत्राटदाराला विचारणार कोण?. ∙∙∙

Khari Kujbuj
Political Satire GoaDainik Gomantak

महत्त्वाच्या बैठकीत ‘तो’अधिकारी दिसलाच नाही!

कला अकादमीच्या त्रुटीसंबंधात तपासणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘टास्क फोर्स’चे अध्यक्ष विजय केंकरे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या कला अकादमीच्या एका अधिकाऱ्यासंबंधी ‘कुजबूज’ ‘गोमन्तक’मध्ये प्रसिद्ध झाली होती.‌ त्याची दखल टास्क फोर्सच्या काल झालेल्या बैठकीमध्ये सदस्यांकडून घेण्यात आली. दोन महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये वितुष्ट आणण्याचा हा प्रयत्न म्हणजे ‘टास्क फोर्स’च्या कामात विविध प्रकारे अडथळे आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग होता की काय, असाही प्रश्न काही जणांकडून विचारला गेला. विशेष म्हणजे कालच्या ‘टास्क फोर्स’च्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहणेच या अधिकाऱ्याने पसंत केले होते. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; सायबाच्‍या ओल्‍या पार्टीची गोष्‍ट

देवस्थानांतील वाद पथ्यावर

शिरगाव येथील जत्रेवेळी चेंगराचेंगरी झाली आणि सहा जणांना प्राण गमवावे लागले. अनेकजण जखमी झाले तर काहीजण अद्यापही उपचार घेत आहेत. सरकारी पातळीवर सत्यशोधन समिती नेमली गेली असताना आता स्थानिक वाद उफाळून आला आहे. देवस्थानचे माजी अध्यक्ष गणेश गावकर यांच्यावर देवस्थानचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी शरसंधान केले. त्यानंतर दीनानाथ गावकर यांनी या दुर्घटनेसाठी गणेश यांनाच जबाबदार धरले. भंडारी समाजाच्या ऐक्याचे प्रयत्न सुरू असतानाच समाजातील दोन जणांची ही दुफळी पुढे आली आहे. यामुळे समाजातील काही नेते स्तिमित झाले असले तरी सत्ताधारी वर्तुळात मात्र आनंदाचेच वातावरण आहे. यामुळे एकाचा बोलवता धनी सत्ताधारी वर्तुळात असल्याची चर्चा आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; ‘स्मार्ट बस’ अचानक गायब!

मंत्रिमंडळ फेरबदल लांबणीवर?

सध्या भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धस्थिती ओढवली असल्याने केंद्रातील नेते ‘वॉररुम’मध्ये गुंतले आहेत. या दरम्यान, मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी ज्यांनी -ज्यांनी देवाला साकडे घातले होते, किंवा ज्यांना ज्यांना मुख्यमंत्र्यांनी अच्छे दिन येणार असे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या तोंडचे सध्या तरी पाणी पळाले आहे. कारण ‘आॅपरेशन सिंदूर’ मुळे पाकची मस्ती जिरवण्याची संपूर्ण देशाची इच्छा फलद्रुप होताना मंत्रिमंडळ फेरबदलाच्या प्रक्रियेकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ असणार आहे. परिणामी मंत्रिमंडळ फेरबदल शीतपेटीत गेला की लांबणीवर पडला, हे कळायला सध्यातरी मार्ग नाही. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com