पणजी: खाण खात्याने पुकारलेल्या ई-लिलावात कोडली खाणपट्टा जेएसडब्ल्यू स्टील या कंपनीने जिंकला. त्यांनी बोली भावापेक्षा ९२.६ टक्के जास्त बोली लावत हा खाणपट्टा जिंकला आहे. देशातील सर्वांत मोठी लोहखाण म्हणून कोडली खाण ओळखली जाते. यापूर्वी ती सेसा गोवा आणि नंतर वेदान्ताकडे होती.
राज्य सरकारने तीन खाणपट्ट्यांचा लिलाव पुकारला आहे. त्यासाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र कंपन्यांना आर्थिक बोली लावण्यासाठी पात्र ठरविले जाते. आजच्या या बोलीसाठी १० कंपन्या पात्र ठरल्या आहेत. या खाणपट्ट्यात ५.६ दशलक्ष मेट्रिक टन लोहखनिज आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. त्याआधारे ही बोली लावण्यात आली आहे.
राज्यातून केवळ वार्षिक २० दशलक्ष मेट्रिक टनच खनिज निर्यात केले जाऊ शकते. या खाणीत ०.५ दशलक्ष मेट्रिक टन साठवलेले खनिज आहे. राज्यात खाणकाम बंदीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खाणकाम पुन्हा सुरू झाले, तेव्हा कोडली खाणीतूनच खाणकामास पहिल्यांदा सुरवात झाली होती. कोडली खाणपट्टा लोहखनिज साठा जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने लिलावात मिळवला आहे.
कोडली खाणीमध्ये कमी गुणवत्तेची लोखंडयुक्त संरचना खोलगट भागांत उपयुक्त स्वरूपात साठली आहे. ३.१ किलोमीटर लांब आणि १.६ किलोमीटर रुंद असे हे खाण क्षेत्र आहे. ही खाण समुद्र सपाटीपासून ८४ मीटर उंचीवर आहे. सध्या खाणीत ५० मीटर खालीपर्यंत खोदकाम झालेले आहे. खाण क्षेत्रात गुलाबी रंगाचे मातीचे क्षेत्र दिसून येते.
या खाणपट्ट्याच्या ताब्यातून जेएसडब्ल्यू स्टीलला त्याच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यास मोठी मदत होणार आहे. लोहखनिजाच्या साठ्यांमुळे कंपनीला स्वतःच्या गरजांसाठी कच्चा माल मिळेल, ज्यामुळे देशांतर्गत स्टील उत्पादनाला बळकटी मिळेल. जेएसडब्ल्यू स्टीलच्या या लिलाव विजयामुळे कंपनीच्या उत्पादन क्षमतेत वाढ होणार असून, यामुळे भारतीय स्टील उद्योगाला चांगली चालना मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.