

Goa VVIP Visits: नवीन वर्षाचा पहिलाच महिना गोव्यासाठी अत्यंत धामधुमीचा ठरणार आहे. देशाच्या राजकारणातील 'बिग थ्री' अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे एकामागून एक गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या हाय-प्रोफाईल भेटींमुळे राज्याची सुरक्षा यंत्रणा, वाहतूक विभाग आणि सामान्य प्रशासन पूर्णपणे सक्रिय झाले असून, संपूर्ण महिनाभर गोव्यात कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळणार आहे.
वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गोव्यात येणार आहेत. ४ जानेवारी रोजी त्यांचे गोव्यात आगमन होईल, तर ५ जानेवारीला ते गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) येथे आयोजित एका महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. संरक्षण क्षेत्रातील हा अत्यंत संवेदनशील कार्यक्रम असल्याने नौदल, केंद्रीय सुरक्षा दले आणि गोवा पोलीस यांनी एकत्रितपणे सुरक्षेचा आराखडा तयार केला आहे. वास्को आणि दाबोळी परिसरात या काळात विशेष निगराणी ठेवली जाणार असून, हवाई सुरक्षेबाबतही कडक पावले उचलली गेली आहेत.
महिन्याच्या मध्यभागी, म्हणजेच १६ जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बांबोळी येथील एका आलिशान हॉटेलमध्ये होणाऱ्या पश्चिम विभागीय परिषदेसाठी (Western Zonal Council) उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेत गोवा, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमधील मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि वरिष्ठ सनदी अधिकारी सहभागी होणार आहेत. राज्यांतर्गत प्रश्न, सीमा सुरक्षा आणि प्रशासकीय समन्वयावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. बांबोळी परिसरात या निमित्ताने 'हाय अलर्ट' घोषित करण्यात आला आहे.
जानेवारी महिन्याचा शेवट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याने होईल. २७ जानेवारीपासून दक्षिण गोव्यातील बेतुल येथे 'इंडिया एनर्जी वीक' (India Energy Week) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात केवळ भारतीयच नव्हे, तर जगभरातील ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ, मोठे उद्योगपती आणि परदेशी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बेतुल परिसर या जागतिक सोहळ्यासाठी सज्ज झाला असून, पंतप्रधानांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी (SPG) आधीच पाहणी पूर्ण केली आहे.
या तीनही मोठ्या दौऱ्यांमुळे गोवा पोलिसांसमोर वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. बांबोळी, गोवा शिपयार्ड आणि बेतुल ही ठिकाणे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या काळात अनेक मार्गांवरील वाहतूक वळवण्यात येण्याची शक्यता असून, व्हीव्हीआयपी कॉन्व्हॉयसाठी काही वेळ रस्ते बंद ठेवले जाऊ शकतात. याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर आणि पर्यटकांच्या प्रवासावर होण्याची शक्यता असली, तरी प्रशासनाने शक्य तितक्या कमी त्रासात हे दौरे यशस्वी करण्याचे नियोजन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.