

मडगाव: नवी दिल्ली येथील ध्यान फाउंडेशन या संस्थेकडून जांबावली येथे चालविल्या जाणाऱ्या गोशाळेची मोडतोड केल्याप्रकरणी केपे पोलिसांनी चौकशी सुरू केली असून आज तक्रारदार अर्चना चौबे यांच्या उपस्थितीत या गोशाळा स्थळाचा केपे पोलिसांनी पंचनामा केला.
दरम्यान, या मोडतोडीत जांबावली देवस्थानचा कुठलाही हात नसल्याचा खुलासा देवस्थान समितीकडून करण्यात आला असून रविवारी या विषयावर चर्चा करण्यासाठी देवस्थान समितीची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्ञान फाउंडेशनने देवस्थानच्या जागेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून या शेडस् उभारल्या होत्या आणि यासंदर्भात यापूर्वी पोलिसांत तक्रारही देण्यात आली आहे असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, आज बजरंग दलाच्या एका शिष्टमंडळाने केपे पोलिस स्थानकाला भेट देऊन या शेडची मोडतोड केल्यामुळे त्यात असलेली जी गुरे गायब झाली आहेत, त्यांचा पोलिसांनी तत्काळ शोध घ्यावा अशी मागणी केली आहे. बजरंग दलाचे गोवा संयोजक विराज देसाई यांनी ही मागणी केली आहे.
सध्या केपे पोलिस स्थानकात ध्यान फाउंडेशनने दिलेल्या तक्रारीनुसार, २२ जुलैच्या मध्यरात्री सुमारे १५० जणांचा जमाव आणून या जागेत असलेल्या सुमारे आठ शेडची मोडतोड करण्यात आली असून त्यामुळे संस्थेचे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले होते.
या मोडतोडीत देवस्थान समितीचा हात असून ही गोशाळेची जागा आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेला व्यावसायिक प्रकल्प बांधण्यासाठी द्यायची होती. त्यामुळेच ही गोशाळा पाडली आणि त्यामुळे सुमारे ३०० गुरे बेघर झाली आहेत असे म्हटले होते. या प्रकरणात देवस्थानचे अध्यक्ष मंजुनाथ दुकळे आणि विश्व हिंदू परिषदेचे गोवा अध्यक्ष प्रवास नायक यांच्यासह एकूण सुमारे १५० जणांवर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.
देवस्थानचा खुलासा...
या मोडतोडीत देवस्थान समितीचा कोणताही संबंध नाही. उलट ध्यान फाउंडेशनने देवस्थान समितीच्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार यापूर्वी देण्यात आली हाेती.
२०१५ साली या संस्थेला फक्त एक शेड उभारण्याची परवानगी देवस्थान समितीने दिली होती. यासंबंधी जो करार केला होता, त्या कराराची मुदत कधीच संपली आहे.
असे असताना या फाउंडेशनने देवस्थानची परवानगी न घेता या जागेत आणखी शेड उभारल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.