Panjim News महापालिकेच्या मार्केट परिसरात साहित्य विक्री करणाऱ्यांकडून विना पावती सोपो कर आकारणी होत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या प्रकरणाची गंभीर दखल आयुक्त क्लेन मदेरा यांनी घेतली आहे.
हा घोटाळा किमान दहा ते पंधरा वर्षांपूर्वीपासून सुरू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. याच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली असून, दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी ‘गोमन्तक''ला दिली.
यासंदर्भात आयुक्त मदेरा म्हणाले की, काही दिवसांपूर्वी विना पावती सोपो कर गोळा केल्याच्या प्रकाराची आम्ही गंभीर दखल घेतली आहे.
या प्रकरणात नागेश बद्री या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे, तर एका पर्यवेक्षकास (सुपरवायझर) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. महापालिका अभियंता विवेक पार्सेकर, लेखा कर अधिकारी सिद्धेश नाईक आणि एसीओ यांचा या समितीत समावेश आहे, असे मदेरा यांनी सांगितले.
या समितीच्या चौकशीतून विना पावती सोपो करवसुली किती वर्षांपासून सुरू आहे, या प्रकरणात संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते कोणापर्यंत पैसे पोहोचत होते, याचा उलगडा होणार आहे.
मशीन निर्णायक
ज्या पद्धतीने जर एखाद्या दिवशी अमूक एवढे विक्रेते होते, म्हणून सोपो कर एवढाच आला, तर नेहमीप्रमाणे येणारा सोपो कर किती अपेक्षित होता, त्याशिवाय सध्या मशीन दिल्यामुळे किती कर आला आहे, याचा ताळमेळ ती समिती घालेल आणि त्यातून आतापर्यंत महापालिकेच्या किती रकमेवर डल्ला मारला, हे स्पष्ट होणार आहे.
असा आहे सोपो संकलन घोटाळा
महापालिकेच्या पणजीतील मार्केटमध्ये पहाटे चार वाजल्यापासून सोपो कर संकलनास सुरुवात होते.
दररोज दोनशे ते अडीचशे विक्रेते मार्केटबाहेर व्यवसाय करतात, हेच मूळ सोपो करदाते.
प्रकरण उघडकीस आल्याने मार्केट सुपरवायझर व कर संकलक कर्मचाऱ्यांचे दणाणले धाबे
करावर डल्ला मारणाऱ्यांची मोठी साखळी असण्याची शक्यता
वर्षाकाठी अंदाजे २५ लाखांचा कर जमेस धरल्यास ही रक्कम ५.७५ कोटींवर जाते.
मशीनमुळे महापालिकेच्या तिजोरीत जमा होणाऱ्या रकमेत दिसून आली तफावत
यातील मास्टरमाईंड शोधण्यासाठी आयुक्तांनी उचलली कडक पावले.
चौकशीचे स्वागत : उदय मडकईकर
महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, या चौकशीतून ‘डोंगर पोखरून उंदीर निघू नये’, ही अपेक्षा आहे. कारण मी बाजार समितीचा अध्यक्ष होतो, तेव्हा सोपो कर संकलनासाठी मशीन आणले होते, ते कोणी मोडले, ते का दुरुस्त केले नाही.
आतापर्यंत जे महापौर झाले, बाजार समितीचे अध्यक्ष झाले, त्यांचीही चौकशी व्हायला हवी. याशिवाय या कर संकलनाकडे तत्कालीन एटीओ, सुपरवायझर यांनी का दुर्लक्ष केले, हेही समोर आले पाहिजे.
या चौकशीसाठी माझे नेहमीच सहकार्य राहील, असे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी मनपाच्या एका कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले होते.
या प्रकरणात नक्की पैसा जात होता कुठे, हे तपासले जाईल. महापालिकेच्या तिजोरीत किती पैसा आला की, आलाच नाही, हेही तपासणे आवश्यक आहे. कोणताही राजकीय दबाव न घेता याची चौकशी जाणार असून, दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
या प्रकरणाचा खरा मास्टरमाईंड कोण, हे उघड करणे आवश्यक आहे. या प्रकरणात राजकीय दबाव येऊ नये म्हणून कारवाई सुरू केली आहे.
- क्लेन मदेरा, आयुक्त, महापालिका, पणजी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.