पणजी: गोव्यातील आयर्नमॅन 70.3 शर्यतीत नियमित स्पर्धकांसह पोलिस, सेनादल, तसेच प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचाही कस लागणार आहे. रविवार दि 13 नोव्हेंबर रोजी राजधानीत होणाऱ्या या आव्हानात्मक शर्यतीत अधिकारी वर्गातील 99 ट्रायथलिट्स 33 रिले संघातून भाग घेतील.
(Ironman 70.3 race in Goa will be attended by police army and administrative officials)
‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ चळवळीअंतर्गत पोलिस, सेनादल, प्रशासकीय अधिकारी मोठ्या उत्साहाने आयर्नमॅन शर्यतीत शारीरिक तंदुरुस्ती आजमावणार आहेत. गोव्यातील आयर्नमॅन शर्यतीत ट्रायथलिट्सना साडेआठ तासांत 1.9 किलोमीटर समुद्र (खुले) जलतरण, 90 किलोमीटर सायकलिंग व 21 किलोमीटर धावावे लागेल.
आयर्नमॅन शर्यतीसाठी सरकारी अधिकाऱ्यांची मोफत नोंदणी करण्यात आली आहे, त्यांना सरावाची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे शर्यतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक राज यांनी सांगितले.
सरकारी अधिकारीही तुल्यबळ
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव 39 वर्षीय आयएएस अधिकारी अजित रॉय आयर्नमॅन शर्यतीत सहभागी होत आहेत. ‘‘सरकारी अधिकारीही तुल्यबळ आहेत. शर्यतीत भाग घेणाऱ्या इतर ट्रायथलिट्सप्रमाणेच आम्ही सरकारी अधिकारीही आहोत हे सिद्ध होईल,’’ असा विश्वास अजित रॉय यांनी व्यक्त केला. शर्यतीत भाग घेण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल, तसेच शर्यतीची तयारी करताना आहार, विश्रांती या अनुषंगाने मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.
हैदराबादचे पोलिस अधिकारीही शर्यतीत
हैदराबादस्थित पोलिस उप महानिरीक्षक 42 वर्षीय आयपीएस अधिकारी सेजू कुरुविल्ला यांचाही शर्यतीतील सहभाग उल्लेखनीय असेल. आपण आयर्नमॅन शर्यतीत तंदुरुस्तीचा जागर करण्याच्या उद्देशाने सहभागी होत असल्याचे कुरुविल्ला यांनी सांगितले.
‘‘वरिष्ठ अधिकारी आपल्या तंदुरुस्तीद्वारे गणवेशधारी दलातील इतरांसाठी आदर्शवत आणि प्रेरणादायी ठरतील,’’ असे ते म्हणाले. नौदलातील कमांडर राकेश हांडा हे सुद्धा शर्यतीत भाग घेत असून देशातील ही एकमेवाद्वितीय आयर्नमॅन शर्यत असल्याचे त्यांनी नमूद केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.