International Award : मूळचा गोमंतकीय आणि सध्या बंगळुरु येथे जपानी 'डेन्टेत्सु क्रिएटिव्हिटी' या जाहिरात कंपनीत आर्ट डायरेक्टर पदावर असलेल्या अमेय अनिल चोडणकर यांना आतरराष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार जाहीर झाला आहे. फ्रान्स येथील कान्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल आॕफ क्रिएटिव्हिटी 2022 मध्ये जागतिक पातळीवर 'नं. १ क्रिएटिव्ह डायरेक्टर ऑफ द ईयर 2022' या पुरस्काराबरोबर 'टायटॅनिअम लायन' या प्रतिष्ठित बहुमानाचे ते मानकरी ठरले आहेत. त्यांच्या या पुरस्काराबरोबर त्यांच्या डेन्टेत्सु क्रिएटिव्हिटीज या आस्थापनालाही जगातील सर्वोत्कृष्ट जाहिरात कंपनी म्हणून निवडण्यात आलं आहे.
कान्स लायन्सतर्फे 1954 पासून जागतिक पातळीवर जाहिरात क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार देण्यात येतात. कान्स लायन्स आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्हिटी 2022 महोत्सवाचा वार्षिक अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात 'क्रिएटिव्ह डायरेक्टर' विभागात अमेय चोडणकर याचे नाव प्रथम क्रमांकावर झळकले आहे. या अहवालात जाहिरात क्षेत्रातील विविध विभागातून 16 जणांना पुरस्कार प्राप्त झाले असून अशा प्रकारचा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त करणारा अमेय चोडणकर हा पहिलाच गोमंतकीय आहे.
डेन्टेत्सु क्रिएटिव्हिटी या जाहिरात कंपनीचे आर्ट डायरेक्टर अमेय चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली इतर सहकाऱ्यांच्या मदतीने ब्रिटिश म्युझियमवर आधारित 'आनफिल्टर्ड हिस्ट्री टुर' या शीर्षकावर 'व्हाईस वर्ल्ड न्यूज' यांच्या मदतीने एक जाहिरात प्रकाशित केली होती. सदर जाहिरात जगभर गाजली आणि तिच जाहिरात या महोत्सवात पुरस्कारास प्राप्त ठरली आहे.
महोत्सवात या जाहिरातीला सर्व विभागात मिळून एकुण 12 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर, जाहिरात शीर्षक, आर्ट डायरेक्टर ऑफ द ईअर, कॉपीरायटर आॕफ द ईअर यांचा समावेश आहे. या कंपनीला या महोत्सवात 1 टायटॅनियम लायन, 3 ग्रँड प्रिक्स, 1 गोल्डन लायन, 4 सिल्व्हर लायन आणि 3 ब्रॉन्झ लायन हे पुरस्कार लाभलेले आहेत.
अमेय चोडणकर यांना यापूर्वी देशभरात काही पुरस्कार मिळालेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे. हल्लीच त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये स्पाईक- एशिया हा प्रतिष्ठेचा आणि डि अँन्ड एडी या पुरस्कारांचा समावेश आहे.
'भारत देशासाठी हे पुरस्कार मिळणे हा एक अभिमानाचा क्षण आहे. मला मिळालेला हा सन्मान गोमंतकीय तरुणांना प्रोत्साहित करणारा असून जे तरुण आज जाहिरात किंवा डिझाईनिंग क्षेत्रात काम करतात त्यांना प्रोत्साहित करणारा आहे. तरुणांनी आपल्या अंगातील कौशल्याचा शक्य तेवढा वापर करुन उच्च ध्येय गाठण्याची संधी प्राप्त करावी, अशी प्रतिक्रिया पुरस्कार विजेता अमेय चोडणकर यांनी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.