Ponda Municipal Elections 2023 : प्रभाग 4, 6, 8, 14मध्ये तीव्र लढा; गाठीभेटी वाढल्या

तीन नगरसेवक तसेच नगरसेवकांच्या पत्नी-कन्येची प्रतिष्ठा पणाला
Ponda Municipal Council Election 2023
Ponda Municipal Council Election 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

फोंडा पालिका निवडणूक आता अगदी जवळ आल्यामुळे प्रचाराला एक वेगळीच दिशा प्राप्त व्हायला लागली आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने मतदारांना रिझविण्याचा प्रयत्न करीत असून काल रविवारच्या तसेच आजच्या कामगार दिनाच्या सुट्टीचा उमेदवारांनी चांगलाच उपयोग करून घेतल्याचे दिसून आले आहे.

प्रभाग ४, ६, ८ व १४मध्ये सध्या प्रत्येक उमेदवार शर्थीचे प्रयत्न करताना दिसत असला तरीही मतदारांचा कानोसा घेतल्यास त्यांचा कल कोणत्या दिशेने जात आहे, हे काही प्रमाणात का होईना स्पष्ट होत आहे.

प्रभाग ४ मध्ये माजी नगराध्यक्ष तथा प्रभाग ५चे विद्यमान नगरसेवक व्यंकटेश नाईक यांना या प्रभागाच्या नगरसेविका चंद्रकला नाईक यांच्याशी सामना करावा लागत आहे. या लढतीचा तिसरा कोन भाजप पॅनेलचे संदीप घाडी आमोणकर हे असून ते या दोन नगरसेवकांना आपल्या परीने तोंड देताना दिसत आहेत. आता या दोन नगरसेवकांच्या प्रतिष्ठेच्या झुंजीत आमोणकर कुठे बसतात ते पहावे लागेल.

Ponda Municipal Council Election 2023
Nagvem-Valpoi: बार मालक, कर्मचाऱ्यांकडून युवकाला मारहाण; कुक, वेटरला अटक, गावकरी संतप्त

प्रभाग ६ मध्ये विद्यमान नगरसेवक विलियम आगियार यांनी आपली पत्नी लिविया फर्नांडिस यांना मैदानात उतरवले असून त्यांना भाजप पॅनेलचे शौनक बोरकर व रायझिंग फोंडाचे मंगेश कुंडईकर यांच्याशी सामना करावा लागत आहे.

गेल्या वेळी झालेल्या तिरंगी लढतीत काँग्रेस पॅनेलतर्फे रिंगणात उतरलेल्या विलियमनी बाजी मारली होती. पण यावेळी त्यांच्या काही अडचणींमुळे त्यांनी आपल्या पत्नीला रिंगणात उतरवले आहे.

मंगेश कुंडईकर हेही फोंड्यातील मगो पक्षाचे महत्त्वाचे नेते समजले जात असल्यामुळे रायझिंग फोंडानेही या प्रभागात चांगले लक्ष घातलेले दिसून येत आहे. सध्या तिन्ही उमेदवार प्रभाग पिंजून काढत असून नागरिकांचा कानोसा घेतल्यास अटीतटीच्या लढतीची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रभाग ८ हा महिलांकरता आरक्षित झाल्यामुळे प्रभागाचे विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांनी आपली कन्या ॲड. प्रतीक्षा नाईक यांना रिंगणात उतरवले आहे. रायझिंग फोंडातर्फे रिंगणात उतरलेल्या ॲड. प्रतीक्षा यांना काँग्रेस पॅनेलच्या सोनाली सुदेश नाईक व भाजप पॅनेलच्या विद्या नाईक यांच्याशी संघर्ष करावा लागत आहे.

प्रभाग १४ मध्ये यावेळी विद्यमान नगरसेवक आनंद नाईक यांना रायझिंग फोंडाचे सूरज ऊर्फ अनिल नाईक यांना तोंड द्यावे लागत आहे. सूरज नाईक हे मगो फोंडाचे गटाध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत आहे.

गेल्यावेळी आनंद नाईक यांनी ११७ मतांनी विजय प्राप्त केला होता. कृषिमंत्री रवी नाईक यांचे स्वीयसचिव असलेले आनंद नाईक हे गेल्या वेळी काँग्रेस पॅनेलतर्फे रिंगणात होते. आता मात्र ते भाजप पॅनेलतर्फे निवडणूक लढवीत आहेत.

सूरज नाईक यांनी गेल्यावेळी प्रभाग ११ मधून निवडणूक लढविली होती. अजित पारकर हे या लढतीतले तिसरे उमेदवार असले तरीही प्रामुख्याने लढत आनंद नाईक व सूरज नाईक यांच्यामध्येच होईल, असेच चित्र दिसते आहे.

प्रभाग पुनर्रचनेत या प्रभागात बदल झाला असून त्याचा फायदा कोणाला होतो हेही बघावं लागेल. एकंदरीत या चार प्रभागांत लढतींना एक वेगळी धार प्राप्त झाली आहे, एवढे नक्की.

Ponda Municipal Council Election 2023
Traffic Management Plan : वाहतूक व्यवस्थापन आराखडा कुठे?

व्यंकटेश विक्रमवीर ठरणार?

यावेळी जर प्रभाग ४मधून व्यंकटेश नाईक विजयी झाले तर ते सलग चारवेळा निवडून येणारे फोंडा पालिकेतील पहिले नगरसेवक ठरणार आहेत. फोंडा पालिकेच्या इतिहासात आतापर्यंत एकही नगरसेवक सलग चारवेळा निवडून आलेला नाही. आता व्यंकटेश यांच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला जातो की नाही याचे उत्तर ७ मे रोजी मिळणार आहे.

भाजप, काँग्रेस, रायझिंग फोंडाची प्रतिष्ठा पणाला

  • या चारही प्रभागांत भाजपने आपले उमेदवार उतरवले असून त्यांनी हे चारही प्रभाग प्रतिष्ठेचे बनविले आहेत. प्रभाग ४ व ६ हे भाजपच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे ठरताना दिसत आहेत.

  • प्रभाग ४ व १४वर कृषिमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी लक्ष केंद्रित केले असून ते प्रसंगाप्रमाणे आपली रणनीती आखताना दिसत आहेत.

  • प्रभाग ६वरही भाजप नेत्यांनी ‘फोकस’ केला असून खडपाबांध हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून गणला जात असल्यामुळे यावेळी भाजप पॅनेलचा उमेदवार आणण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ४) अनेक मान्यवरांनी या प्रभागातील भाजप पॅनेलचे उमेदवार शौनक बोरकर यांनी काँग्रेस पॅनेलच्या उमेदवार लिविया यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे.

  • काँग्रेसनेही प्रभाग ६ व ८ जिंकण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

  • रायझिंग फोंडाचे डॉ. केतन भाटीकर हेही आपल्या लवाजम्यासह प्रभाग ६, ८ व १४ मध्ये फिरताना दिसत आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com