पणजी: क्रुड ऑईलच्या किमतीमध्ये वाढ होत असल्याचे कारण देत देशातील पेट्रोलियम कंपन्या रोजच इंधन दरवाढ करत आहेत. गेल्या 14 दिवसांत 12 वेळेला ही दरवाढ झाली आहे. आज पेट्रोलमध्ये 84 पैसे तर डिझेलमध्ये 43 पैशांनी वाढ झाली. त्यामुळे राज्यात 104.65 रुपये प्रति लिटर पेट्रोल तर डिझेलचा दर 95.53 पैसे झाला आहे.
नुकतीच व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये ही मोठी वाढ झाली आहे. या सर्वांचा परिणाम जीवनावश्यक वस्तू, तेल, मासे, डाळी यांच्यावर होतोय. यातच राज्य सरकारने वीज दरामध्ये आठ टक्के वाढ केली असून या महिन्याची पाणी बिलेही वाढून आली आहेत. याविरोधात विरोधक आक्रमक झाले असून ही दरवाढ नियंत्रणात न आणल्यास आंदोलन छेडणार असल्याचे विरोधी पक्षनेते नेते मायकल लोबो यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.
‘पीडब्ल्यूडी’वर मोर्चा
केपे: टोनीनगर सावर्डे येथील लोकांनी आज पाण्याची वाढीव बिले आल्याने बाणसाय येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढला. तीन महिन्यांची वाढीव बिले एकत्रित आल्याने लोकांनी ती कशी भरावी असा प्रश्न यावेळी लोकांनी उपस्थित केला.
पेट्रोल लिटरमागे 8.40 रुपयांनी महागले
सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ सुरू असून पेट्रोल, डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्याही किमती वाढल्या आहेत. राज्यांमधील स्थानिक कर आकारणीनुसार इंधनाच्या दरात कमी अधिक फरक असला तरी मागील 12 दिवसांपासून या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना लिटरमागे 8.40 रुपये वाढीव किंमत मोजावी लागत आहे.
पाण्याची वाढीव बिले: नागरिकांना पाण्याचीही वाढीव बिले येत आहेत. यामुळे मडगाव आणि वास्को येथील नागरिकांनी आज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागावर मोर्चे काढत जाब विचारला. महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांचे आता तोंडचे पाणी देखील पळाले आहे.
जेईआरसीचा ‘झटका’
महागाई आणि इंधन दरवाढीने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता विजेचाही शॉक बसणार आहे. संयुक्त वीज नियामक आयोगाने घरगुती वीज वापराच्या दरात सरासरी 8 टक्के वाढ सुचवली आहे. त्यामुळे प्रति वॅटमागे 10 ते 95 पैशांनी वीज महागणार आहे. आयोगाने हा प्रस्ताव सरकारला सादर केला असून सरकार या नव्या दराची लवकरच अंमलबजावणी करणार आहे. व्यावसायिक वापर, लष्करी, अभियांत्रिकी सेवा तसेच तात्पुरत्या घेतलेल्या वीज कनेक्शनमध्ये वीज दरात घट सुचवली आहे.
तर औद्योगिक वसाहती, जाहिरातीचे फलक, साईन बोर्ड आदींचे दर कायम ठेवावे अशी शिफारसही आयोगाने केली आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी केल्या जाणाऱ्या विद्युतीकरणासाठी अतिरिक्त दीड टक्के दरवाढ सुचवली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.