Goa CM Dr. Pramod Sawant On Indira Gandhi
फोंडा: इंदिरा गांधी यांनी 1971-72 मध्ये भारतीय संविधानाचा अपमान केला, असे वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. भाजपवर होत असलेल्या संविधान बदलण्याच्या आरोपाला उत्तर देताना सावंत यांनी हे वक्तव्य केले. फार्मागुढी येथे उटा या आदिवासी संघटनेच्या आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते.
संविधानातील प्रत्येक समाजासाठीचा अधिकार हा चंद्र सूय असे पर्यंत अबाधीत राहणार आहे. भारतीय जनता पक्षासाठी भारतीय संविधान सर्वोच्च स्थानी आहे. 1971 आणि 1972 आठवून पहा. संविधानाचा सगळ्यात जास्त अपमान जर कोणी केला असेल तर तो माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी केला, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
एसटींना राजकीय आरक्षण देणे ही मोदींची गॅरेंटी आहे. आम्हाला खोटे बोलण्याची सवय नाही. 2027 पर्यंत गोव्यात एसटींना राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी माझे सरकार प्रयत्नशील असेल.असा पुनरुच्चार मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी केला. उटाच्या द्विशतपूर्ती सोहळ्याचे इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात सुंदर आयोजन असल्याचेही सावंत म्हणाले.
यावेळी उपस्थित एसटी नेते आणि क्रीडा व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी सभापती रमेश तवडकरांना नाव न घेता डिवचल्याचे पाहायला मिळाले. 15 नॉव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यात्रेचे आयोजन करण्यात आलेय. 2008 वर्षी अशीच एका रथयात्रा गोव्यात झाली होती. दोघानी बलिदान दिले, अनेकांनी कैद्य भोगली. मात्र सत्तेची खुर्ची मिळाल्यानंतर 'उटाला खुटा' म्हणणारे हेच ते लोक. आपल्या वैयक्तीक फायद्यासाठी संघटनेचा वापर होता नये., असा टोला मंत्री गोविंद गावडे यांनी सभापती रमेश तवडकरांना नाव न घेता लगावला.
'मुख्यमंत्री सावंत यांच्या प्रयत्नांमुळेच येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात एसटींना गोव्यात राजकीय आरक्षण मिळेल हा आम्हाला विश्वास आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक खात्यात आदिवासींसाठी 12 टक्के ट्रायबल सब प्लॅन, सरकारी नोकऱ्यांमधील बॅकलॉग तसेच प्रमोशन खास मोहिमेद्वारे भरुन काढावे, वन हक्क कायद्यांतर्गत एसटींना जमिनींचे अधिकार द्यावेत. मुख्यमंत्र्यांनी आदिवासी कल्याण खात्याचा योग्य वापर करुन एसटींच्या ह्या वेगवेगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात', असे माजी मंत्री प्रकाश वेळीप म्हणाले.
दरम्यान, फार्मागुढी येथे उटा संघटनेच्या व्दिशतपूर्ती सोहळ्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांसह उटाचे नेते मंत्री गोविंद गावडे, माजी मंत्री प्रकाश वेळीप, उटाचे अध्यक्ष विश्वास गावडे, दुर्गादास गावडे व इतर मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.