Indian Coast Guard गोव्यातील भारतीय तटरक्षक दलाने साहसी बचाव मोहिमेत कार्यक्षमता दाखवत व त्वरित प्रतिसाद देत कारवार येथील खोल समुद्रात इंजिनमध्ये बिघाड झालेल्या व धोक्याच्या स्थितीत असलेल्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या (NIO) संशोधन जहाज ‘सिंधू साधना’पर्यंत पोहचून त्यावरील आठ शास्त्रज्ञांसह 36 जणांचे जीव वाचवले तसेच संभाव्य पर्यावरणीय आपत्ती टाळली.
दलाच्या दोन प्रगत जहाजांनी समुद्राच्या लाटांत सापडलेल्या एनआयओच्या या जहाजाला कारवारच्या दिशेने भरकटत जाण्याच्या संकटातून वाचवून ते ओढत आणण्यात यश मिळवले.
दलाने केलेल्या या बचाव मोहिमेमुळे मोठी दुर्घटना टळली व जहाजावर असलेल्यांचा जीव वाचला. हे जहाज बंद पडल्याचा संदेश काल मध्यरात्रीनंतर गोव्याच्या भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालयात आला.
या दलाचे अधिकारी ‘सिंधू साधना’ या जहाजाचा शोध घेत तेथपर्यंत दलाची बचाव करणारी जहाजे घेऊन पोहचले. जहाजाला बांधून ओढून आणण्यासाठी दलाच्या कर्मचाऱ्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली.
पर्यावरणीय हानी टळली
संशोधनासाठी निघालेल्या ‘सिंधू साधना’ या जहाजामध्ये वैज्ञानिक उपकरणे तसेच महत्त्वपूर्ण संशोधन डेटा होता. तसेच इंजिन नादुरुस्त झालेले हे जहाज समुद्रातील लाटा व वाऱ्यामुळे जर भरकटत गेले असते तर जहाजातील तेलगळती होऊन मोठ्या प्रमाणात सागरी पर्यावरणाला हानी पोहचली असती.
जहाजे गोव्याच्या मार्गावर
दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनुभवाच्या आधाराने आयसीजीएस सुजीत जहाजाने ‘सिंधू साधना’ या जहाजाला यशस्वीरीत्या संकटातून बाहेर काढले. ही दोन्ही जहाजे सध्या गोव्याच्या मार्गावर असून 28 जुलै रोजी सकाळी मुरगाव बंदरात पोहोचण्याची अपेक्षा आहे. सीएसआयआर एनआयओच्या या संशोधन जहाजावरील कर्मचारी सुरक्षित आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.