

Indian Army Women : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या गोवा दौऱ्यावर असून, त्यांनी भारतीय संरक्षण दलातील महिलांच्या बदलत्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला आहे. गोव्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय सैन्यदलात आता महिला केवळ सहाय्यक किंवा पूरक भूमिकांमध्ये मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर त्या आता कठीण आणि आव्हानात्मक मोहिमांचे नेतृत्व करत आहेत.
राजनाथ सिंह यांनी नमूद केले की, पूर्वी महिलांना केवळ ठराविक विभागांमध्येच काम करण्याची संधी मिळत होती. मात्र, आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. "आज आपल्या महिला अधिकारी लढाऊ विमाने चालवत आहेत, निरीक्षक म्हणून काम करत आहेत आणि हवाई वाहतूक नियंत्रक (ATC) म्हणून जबाबदाऱ्या सांभाळत आहेत," असे त्यांनी गौरवाने सांगितले.
इतकेच नव्हे तर, महिलांना आता होव्हरक्राफ्ट चालवण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जात असून लॉजिस्टिक विभागातही त्यांचे स्थान भक्कम झाले आहे. केंद्र सरकारच्या 'जेंडर इन्क्लुजन' धोरणामुळे महिलांना आता थेट फ्रंटलाईन असाइनमेंट मिळत आहेत, जे भारताच्या आधुनिक लष्करी रचनेचे महत्त्वाचे लक्षण आहे.
या दौऱ्यात राजनाथ सिंह यांनी गोव्यातील माजी सैनिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरही तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. गोव्यातील माजी सैनिकांना 'एक्स-सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम' (ECHS) अंतर्गत वैद्यकीय सुविधा मिळवताना अनेक अडचणी येत होत्या.
वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी 'युनायटेड वेटेरन्स असोसिएशन'च्या माध्यमातून हे निवेदन संरक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचवले होते. यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत चर्चा करताना राजनाथ सिंह यांनी आश्वासन दिले की, गोव्यातील ECHS नेटवर्कमधील सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे तातडीने दूर केले जातील.
माजी सैनिकांच्या आरोग्य सेवांमध्ये कोणताही खंड पडू नये आणि त्यांना उपचारासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी मंत्रालय सक्रियपणे पावले उचलत आहे. निवृत्त संरक्षण कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी ही यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे. संरक्षण मंत्र्यांच्या या आश्वासनामुळे गोव्यातील हजारो माजी सैनिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.