
Rajnath Singh on Donald Trump: भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. काही लोकांना भारताचा विकास बघवत नाही. त्यांना भारत महाशक्ती बनलेला पाहावत नाही, असे ते म्हणाले. मात्र, जगात कितीही अडथळे आले तरी भारताची प्रगती थांबणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले, "काही लोकांना भारताचा विकास बघवत नाही. त्यांना असे वाटते की, 'सर्वांचे बॉस आम्ही आहोत, मग भारत इतक्या वेगाने प्रगती कशी करतोय?'" ते पुढे म्हणाले की, हे लोक असेही प्रयत्न करत आहेत की, त्यांच्या देशातील बाजारपेठेत 'मेड इन इंडिया' वस्तू त्यांच्या देशात बनवलेल्या वस्तूंपेक्षा अधिक महाग व्हाव्यात, जेणेकरुन त्यांना कोणी विकत घेणार नाही. मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही भारत इतक्या वेगाने पुढे जात आहे की, आता जगातील कोणतीही ताकद भारताला एक मोठी जागतिक महाशक्ती बनण्यापासून रोखू शकत नाही.
संरक्षणमंत्र्यांनी भारताच्या (India) संरक्षण क्षेत्रातील प्रगतीवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले की, पूर्वी संरक्षण क्षेत्रातील बहुतांश वस्तू परदेशात बनत होत्या आणि त्यासाठी परदेशी भांडवल लागत होते. जेव्हा आपल्याला त्यांची गरज भासायची, तेव्हा आपण इतर देशांकडून त्या विकत घेत होतो. यात विमाने, शस्त्रे आणि इतर उपकरणे यांचा समावेश होता. पण आता यातील अनेक वस्तू केवळ भारतातच नाहीतर भारतीय लोक स्वतःच्या हातांनी बनवत आहेत आणि त्यांची निर्यातही इतर देशांमध्ये केली जात आहे.
संरक्षण क्षेत्रातील निर्यातीचे आकडे देताना राजनाथ सिंह म्हणाले की, "जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान बनले, तेव्हा भारताची संरक्षण उत्पादनांची निर्यात फक्त 600 कोटी रुपये होती. आता मात्र, आपण 24 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या संरक्षण वस्तूंची निर्यात करत आहोत." हीच नव्या भारताची ताकद आहे आणि हेच आपल्या संरक्षण क्षेत्राचे नवे स्वरुप आहे, असे ते म्हणाले. ही निर्यात भविष्यातही वाढत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारताने मोठी प्रगती केली आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. पूर्वी परदेशी तरुण जी तंत्रज्ञान विकसित करत होते, तेच तंत्रज्ञान आता आपल्या देशातील तरुण विकसित करत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करुन ते शस्त्रे, बॉम्ब, तोफा आणि क्षेपणास्त्रे यांसारखी अनेक संरक्षण उत्पादने बनवत आहेत.
त्याचवेळी, त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत शत्रूंना एक कडक संदेश दिला. ते म्हणाले, "पहलगामच्या घटनेनंतर शत्रू देशाने असा विचार केला होता की, भारत शांत बसेल, पण आम्ही ठरवले होते की आम्ही त्याला सडेतोड उत्तर देऊ. आम्ही धर्म पाहून नाहीतर त्याचे कर्म पाहून हल्ला करु आणि आम्ही तसेच केले." 'ऑपरेशन सिंदूर'मधून आम्ही जगाला हाच संदेश दिला की, 'आम्ही कोणालाही त्रास देत नाही, पण जर कोणी आम्हाला त्रास दिला, तर आम्ही त्याला सोडत नाही.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.