India Energy Week 2026
India Energy Week 2026Dainik Gomantak

'भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था'! इंडिया एनर्जी वीकचे उद्‌घाटन; PM मोदींनी कॉन्फरन्सिंगद्वारे केले उद्घाटन

India Energy Week 2026: ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठा धोका म्हणजे अपुरी गुंतवणूक आहे. ऊर्जा सुरक्षा, परवडणूक व शाश्वततेसाठी सर्व प्रकारच्या ऊर्जेत संतुलित गुंतवणूक आवश्यक आहे.
Published on

मडगाव: ‘इंडिया एनर्जी वीक २०२६’चे उद्‌घाटन बेतूल येथे मंगळवार, २७ रोजी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी, संयुक्त अरब अमिरातीचे उद्योग व प्रगत तंत्रज्ञान मंत्री सुलतान अहमद अल जाबेर आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. जागतिक ऊर्जा क्षेत्रातील धोरणकर्ते, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले.

मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऊर्जा सुरक्षा, आत्मनिर्भरता आणि हवामान न्यायाच्या दिशेने साधलेली ठोस व संतुलित प्रगती अधोरेखित केली. अल्पावधीतच ‘इंडिया एनर्जी वीक’ हे विश्वासार्ह जागतिक व्यासपीठ बनले असून, जागतिक ऊर्जा संक्रमण व अस्थिरतेच्या काळात विविध घटकांना एकत्र आणण्याची भूमिका ते बजावत असल्याचे सांगितले.

जागतिक ऊर्जा संक्रमण म्हणजे केवळ ऊर्जा स्रोतांची अदलाबदल नसून ती ‘ऊर्जा वाढ’ असल्याचे स्पष्ट करत पुरी यांनी तेल, वायू, जैवइंधने, हरित हायड्रोजन, ‘एलएनजी’ तसेच स्वच्छ स्वयंपाक इंधनांमध्ये सातत्यपूर्ण गुंतवणुकीची गरज अधोरेखित केली. उपलब्धता, परवडणूक आणि शाश्वतता या तिन्ही घटकांचा समतोल राखत भारत सुधारणा-केंद्रित दृष्टिकोनाने पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी मोठ्या गाळयुक्त खोऱ्यांचे अन्वेषण खुले करणे, ओपन एकरेज लायसन्सिंग पॉलिसी, डिस्कव्हर्ड स्मॉल फील्ड्स निविदा प्रक्रिया आणि जागतिक गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या धोरणात्मक सुधारणांचा त्यांनी उल्लेख केला.

संयुक्त अरब अमिरातीचे मंत्री सुलतान अहमद अल जाबेर यांनी सांगितले की, जागतिक ऊर्जा मागणी परिवर्तनाच्या निर्णायक टप्प्यावर असून, उदयोन्मुख बाजारपेठा, डिजिटलायझेशन आणि विविध ऊर्जा प्रणालींचे एकत्रीकरण यामुळे या बदलाला गती मिळत आहे. या बदलांच्या केंद्रस्थानी भारत असून, आगामी दशकांत जागतिक ऊर्जा मागणीचा प्रमुख चालक भारत ठरेल.

विश्वासार्ह पुरवठादार!

ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठा धोका म्हणजे अपुरी गुंतवणूक आहे. ऊर्जा सुरक्षा, परवडणूक व शाश्वततेसाठी सर्व प्रकारच्या ऊर्जेत संतुलित गुंतवणूक आवश्यक आहे. यूएई-भारत ऊर्जा भागीदारी अधोरेखित करताना ‘एडीएनओसी’ ही भारतासाठी कच्चे तेल, ‘एलएनजी’ व ‘एलपीजी’चा विश्वासार्ह पुरवठादार असल्याचे संयुक्त अरब अमिरातीचे मंत्री सुलतान अहमद अल जाबेर यांनी नमूद केले.

भारत फायदेशीर देश, पंतप्रधान

१२५ देशांतील ऊर्जा क्षेत्रातील उद्योजक आणि प्रतिनिधी सामील असलेल्या ‘इंडिया एनर्जी वीक २०२६’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्‌घाटन केले. आज भारत ऊर्जा क्षेत्रासाठी प्रचंड संधींची भूमी आहे. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, याचा अर्थ देशात ऊर्जा उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत आहे, असे त्यांनी नमूद केले.

सुरक्षित ऊर्जा आणि शाश्वत भविष्य हे यंदाच्या एनर्जी वीकचे ब्रीदवाक्य आहे. ‘इंडिया एनर्जी वीक’ अल्पावधीतच संवाद आणि कृतीसाठी एक जागतिक व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे, असे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, भारत जगातील पेट्रोलियम उत्पादनांच्या पहिल्या पाच निर्यातदारांपैकी एक आहे, ज्याची निर्यात १५० हून अधिक देशांपर्यंत पोहोचते.

India Energy Week 2026
Energy Drinks: एनर्जी ड्रिंक्सचे सेवन वाढवते कॅन्सरचा धोका; नव्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

भारताची ही क्षमता सर्वांसाठी खूप फायदेशीर ठरेल. हे एनर्जी वीक व्यासपीठ भागीदारी शोधण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. जगातील उत्पादकांनी भारतात गुंतवणूक करावी. पंतप्रधानांनी नमूद केले की, कालच भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात एक महत्त्वपूर्ण करार झाला, ज्याला जगभरातील लोक ‘सर्व करारांची जननी’ म्हणत आहेत. हा करार भारतातील १४० कोटी लोकांसाठी आणि युरोपीय राष्ट्रांमधील लाखो लोकांसाठी प्रचंड संधी घेऊन येणारा आहे.

India Energy Week 2026
Hyundai पासून Maruti Suzuki पर्यंत, 'या' शानदार कारवर Valentines Week मध्ये मिळणार बंपर ऑफर!

‘सोलेक्स’चा सौर नवोन्मेषाचा ठसा

‘सोलेक्स एनर्जी लिमिटेड’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतन शाह यांनी सांगितले की, भारताने केवळ सौरऊर्जेचा वापर वाढवण्यापुरते मर्यादित न राहता सौर नवोन्मेषाचे नेतृत्व करणे आवश्यक आहे. गोव्यात सौर उद्योग २०२७पर्यंत झपाट्याने वाढण्याचा अंदाज असून, छतावरील सौर प्रकल्प, मॉडेल सौर गावे आणि २४ तास सौरऊर्जेवर आधारित उपक्रमांमुळे तापी रिअर कॉन्टॅक्टसारख्या उच्च-कार्यक्षम तंत्रज्ञानासाठी गोवा एक नैसर्गिक केंद्र ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com