पणजी: पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे (MLA Rohan Khaunte) यांच्या जिल्हा पंचायत सदस्य तसेच तीन पंचायतीच्या पंचसदस्य समर्थकांनी आज काँग्रेस (Congress) प्रवेश केला. त्यामुळे आमदार खंवटे हे सुद्धा लवकरच काँग्रेसवासी होण्याच्या वाटेवर आहेत हे जवळजवळ निश्चित झाले आहे. दोनवेळा अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले आमदार खंवटे हे येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर पर्वरीतून निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोवा विधानसभेत विरोधकांच्या भूमिकेत सरकारला धारेवर धरणारे आमदार रोहन खंवटे हे दोनवेळा पर्वरी मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी प्रत्येक मतदारसंघात राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार उभे करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढवणे धोक्याचे ठरू शकते हे जाणूनच आमदार खंवटे यांनी आपल्या समर्थकांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला देऊन स्वतःही येत्या काही काळात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांचे बंधू राजेश खंवटे हे सुद्धा सांताक्रुझ मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांना काँग्रेस उमेदवारी देण्याच्या अटीवर हा सौदा झाला आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.
भाजप सरकारमधील मंत्रीपदावरून हटविल्यानंतर आमदार रोहन खंवटे हे काँग्रेसवासी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती मात्र त्यांनी प्रवेश न करता काँग्रेसबरोबर राहिले. विधानसभेतही त्यांनी विरोधकांच्या बाजूने किल्ला लढविला. भाजपला आगामी निवडणुकीत सत्तेपासून दूर ठेवण्याचा एककलमी कार्यक्रम काँग्रेसचाही आहे त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पर्वरीचे आमदार खंवटे यांचे समर्थक असलेल्या तीनवेळा जिल्हा पंचाचय सदस्य असलेले भूपेश नाईक, मरिना मोराईश, आग्नेल परेरा, हेमंत बोरकर, श्यामसुंदर कामत, सुभाष हळर्णकर, नारायण नाईक, किशोर सावंत, कोनी पिंटो, इ्स्ताक शेख, दिनेश नाईक, किशोर सावंत, वेरोनिका डिसिल्वा, दिपराज नाईक, सिद्धेश नाईक, रियाझ शेख, एलरिक डिसोझा व दिपक विर्नोडकर यांचा समावेश आहे. काँग्रेस प्रवेश केलेल्यांमध्ये सुकूर पंचायतीच्या 7 सदस्य, पेन्ह द फ्रान्स पंचायतीचे 10 सदस्य तर साल्वादोर द मुंद पंचायतीच्या 5 सदस्यांचा समावेश आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.