Increase Wages Unorganized Workers : महागाई वाढली, त्यामुळे आमदारांचे पगार आणि भत्ते वाढवा, अशी मागणी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केल्यावर सामान्य लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून तुमचे पगार वाढवून घेण्याऐवजी जे असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत त्यांचे पगार कसे वाढतील याकडे लक्ष द्या, अशी मागणी होऊ लागली आहे.
आजच्या आमदारांना खरेच पगार वाढवून देण्याची गरज आहे का? यावर काही राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया विचारली असता माजी आमदार ॲड. राधाराव ग्रासियस म्हणाले, वास्तविक आमदारांना पगार हवाच कशाला असा प्रश्न मला विचारावासा वाटतो.
आज बहुतेक आमदार आपल्या आमदारकीकडे धंदा म्हणूनच पाहतात. कोट्यवधी रुपये खर्चून ते आमदार म्हणून निवडून येतात आणि नंतर या निवडून येण्यासाठी वापरलेल्या भांडवलाचा उपयोग ते आपला धंदा चालविण्यासाठी करतात.
आपण आमदार असताना आपल्याला महिन्याला फक्त अडीच हजार रुपये मानधन मिळत होते याची आठवण त्यांनी करून दिली.
‘आर्थिक स्थितीचा विचार व्हावा’
माजी केंद्रीयमंत्री ॲड. रमाकांत खलप यांना विचारले असता, सगळेच आमदार काही श्रीमंत नसतात, अशांना पगार वाढविला तर काही हरकत नाही.
मात्र, जे धनदांडगे आमदार आहेत त्यांनाही पगारवाढ याचे समर्थन कुणीच करणार नाही. आमदाराची आर्थिक स्थिती आणि पगार यांची एकमेकांशी सांगड घालण्याची प्रथा पाळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दिगंबर कामतांची उडविली खिल्ली
आम आदमी पक्षाचे गोव्याचे अध्यक्ष अमित पालेकर यांनी या मागणीची खिल्ली उडवताना, दिगंबर कामत यांनी स्वतःचा पगार वाढवा अशी मागणी करण्याऐवजी बालरथ चालविणाऱ्या कामगारांचा पगार वाढवा अशी मागणी केली असती तर ते चांगले झाले असते.
कामत यांच्यासारख्या ज्येष्ठ राजकारण्याकडून आमची ही अपेक्षा नव्हती. आमदारांचे पगार वाढविण्याऐवजी खरे तर आमदार झाल्यानंतर त्यांची संपत्ती किती वाढली आणि कशी वाढली याचा लेखाजोगा घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.