पणजी : गोमंतकीयांसाठी शुक्रवार हा घातवार ठरल्याचं चित्र आहे. एकाच दिवशी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटना आणि अपघातांत एकाचा मृत्यू, तर काहीजणांना जायबंदी व्हावे लागले.
सुट्टी असल्याने सहलीसाठी दाभाळ येथे नदीकिनारी आलेल्या विद्यार्थ्यांच्या एका गटातील एकजण बुडाला, तर दुसऱ्याला अत्यवस्थ स्थितीत गोमेकॉत दाखल करण्यात आले. ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. बुडालेल्या विद्यार्थ्याचे नाव योगानंद गावडे (21) असे असून तो बेतोडा येथील रहिवासी आहे, तर पाण्यात गटांगळ्या खाल्ल्याने अत्यवस्थ स्थितीत गोमेकॉत दाखल केलेल्या दुसऱ्या विद्यार्थाचे नाव संतोष देसारी (20) असे असून तो वास्को येथील रहिवासी आहे. (Accidents in Goa News Updates)
गुड फ्रायडेची सुट्टी असल्याने बेतोडा येथील योगानंद गावडे यानेच ही सहल आयोजित केली होती. एकूण नऊजणांचा गट या सहलीत सहभागी झाला होता. सकाळी हा गट कोडार नदीवर पोचला; पण तेथे पाणी योग्य प्रमाणात नसल्याने ते सर्वजण दाभाळ येथील नदीवर गेले. जेवणाची तयारी करत असतानाच योगानंद आणि संतोष हे दोघे पाण्यात उतरले. योगानंद हा पोहण्यात तरबेज होता, तर संतोषला पोहायला येत नव्हते. त्यामुळे तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्याच्या नादात योगानंद खोल पाण्यात गेला आणि बुडाला.
सुदैवाने त्याचवेळी तेथे आलेले कोडली - दाभाळचे पंच सदस्य रमाकांत गावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. माजी सरपंच भोला गावकर तसेच आनंद गावकर यांनीही मदतकार्यात भाग घेऊन अत्यवस्थ संतोषला पिळये आरोग्य केंद्रात नेले. या दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळवल्यानंतर कुडचडे अग्निशमन दलाचे (Fire Brigade) जवान तसेच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बुडालेल्या दुर्दैवी योगानंदचा शोध घेतला. उशिरा योगानंदचा मृतदेह पाण्यात तरंगताना सापडला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला.
यावेळी प्रणय आणि इतरांनी संतोषला वाचवले; पण तो अत्यवस्थ स्थितीत असल्याने त्याला त्वरित वैद्यकीय उपचाराची गरज भासल्याने त्याला इस्पितळात (Hospital) नेले. ‘गुड फ्रायडे’ची सुट्टी असल्याने मौजमस्ती करण्यासाठी नऊजणांचा हा गट सकाळीच गाडी घेऊन कोडार आणि नंतर दाभाळ नदीवर पोचला. यावेळी चिकन-मटणाची व्यवस्थाही केली होती. पण पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली.
दरम्यान बांबोळी येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास उड्डाण पुलावरील महामार्गावर दोन चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या अपघातात (Accident) दोघे किरकोळ जखमी झाले. मात्र, दोन्ही वाहनांची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली. याप्रकरणी आगशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बांबोळी येथील उड्डाण पुलावरील वाहतूक काही ठिकाणी कामामुळे वळवण्यात आली. त्यावेळी हा अपघात झाला.
दुसरीकडे खांडेपार येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. ही धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीचा चक्काचूर झाला असून कारचेही नुकसान झाले.
व्हाळशी-डिचोली येथील दुचाकी अपघातात एक महिला जखमी झाली, तर आमराल बांध, ताळगाव येथे कारने ठोकरल्याने एक दुचाकीस्वार जखमी झाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.