BJP: शेवटी सगळे रस्ते भाजपकडेच?

कोणताही धोका घ्यायचा नाही हा भाजपचा बाणा यातून स्पष्टपणे प्रतीत होत आहे.
BJP
BJPDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगूत

परवा डिचोलीच्या संजय शेट्येंनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी संजयचे बंधू तथा विद्यमान आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना मिळणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राजेश पाटणेकर हे तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे संजयच्या म्हणण्यापेक्षा अप्रत्यक्षरीत्या आमदार चंद्रकांतांच्या भाजप प्रवेशामुळे डिचोली तालुक्यात भाजप अधिकच बळकट झाली आहे, असे म्हणायला हरकत नसावी.

आमदारकीचा राजीनामा द्यावा लागत असल्यामुळे डॉक्टरांनी भाजपप्रवेश केला नाही. अन्यथा आज ते भाजपमध्ये असते. आता डिचोलीत भाजपला विरोधक राहिला आहे तो म्हणजे मगोचे नरेश सावळ. पण सध्या सावळांच्या गोटात ’ठंडा ठंडा कूल कूल’ असे वातावरण दिसत असल्यामुळे भाजपचे आयतेच फावायाला लागले आहे.

आता शेट्येंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे व त्यांना राजेश पाटणेकरांची साथ मिळणार असल्यामुळे भाजप बळकट होणार हे सांगायला तत्त्ववेत्त्यांची गरज नाही. तसे पाहायला गेल्यास विधानसभा निवडणूक अजूनही चार वर्षे दूर आहे. पण लोकसभा निवडणूक मात्र एका वर्षाच्या अंतरावर येऊन ठेपली आहे आणि याचीच पूर्वतयारी भाजप करताना दिसत आहे.

कोणताही धोका घ्यायचा नाही हा भाजपचा बाणा यातून स्पष्टपणे प्रतीत होत आहे. वास्तविक उत्तर गोव्यात सध्या तरी भाजपला पर्याय दिसत नाही. कॉंग्रेस सुस्तावल्यासारखी झाली आहे. युद्धाला निघण्यापूर्वीच तलवारी म्यान करणाऱ्या सैनिकासारखी त्यांची अवस्था झाली आहे. त्यांच्याकडे आता कुमकही राहिलेली नाही.

मायकल लोबोंसारखा उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यावर वर्चस्व असलेला सेनापती परत भाजपमध्ये गेल्यामुळे कॉंग्रेसची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. सध्या जो उठतो तो भाजपमध्ये जातो असे चित्र दिसायला लागले आहे.

दक्षिण गोव्यातही परिस्थिती विशेष वेगळी नाही. दिगंबर कामत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे दक्षिण गोव्यातील भाजपची स्थिती सुधारताना दिसत आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपला केवळ 9000 मतांनी गमवावा लागला होता. आता याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजप आपले जाळे अधिक घट्ट विणताना दिसत आहे.

BJP
Mayem News: मयेतील कळसोत्सवाला गालबोट; उत्सव रद्द

मगोचे सुदिन ढवळीकर यांना मंत्रिपद देणे हा या रणनीतीचाच भाग समजला जात आहे. इथेही कॉंग्रेसच्या गोटात सामसूम दिसते आहे. विद्यमान खासदार सार्दिन हे परत रिंगणात उतरतील असे काही वाटत नाही. तशी ते तयारी करताना दिसत असले तरी त्यांना कॉंग्रेस पक्ष उमेदवारी देईल असे बिलकूल वाटत नाही. गेली चार वर्षे सार्दिन तसे सुस्तच होते. त्यांनी मतदारसंघाकडे बघितले असे कधी दिसलेच नाही. कॉंग्रेसकडे तसे दोन-तीन उमेदवार आहेत. पण ते किती झेप घेऊ शकतील हे सांगणे कठीण आहे.

BJP
Learning: शिकायची सुरुवात - कुठे आणि कशी?

वास्तविक दक्षिण गोवा हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गणला जात होता. पण आता भाजपने या किल्ल्याला खिंडार पाडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे यावेळी इथे भाजप बाजी मारेल अशीच चिन्हे दिसताहेत. मुळात आता कॉंग्रेसजवळ शक्तीच राहिलेली नाही. कॉंग्रेस दिवसेंदिवस दुर्बळ होत चालल्याचे बघायला मिळत आहे.

लोकांचाही कॉंग्रेसवरचा विश्वास उडताना दिसत आहे. भाजपची खासियत म्हणजे ते दूध गरम लागले तर ताकसुद्धा फुंकून पितात. पण ही धूर्त नीती कॉंग्रेसजवळ दिसत नाही. त्यामुळे भाजपला रान मोकळे झाल्यासारखे वाटायला लागले आहे. आपण कोणालाही पक्षात आणू शकतो, असा त्यांचा आत्मविश्वास या वृत्तीतूनच बोकाळायला लागला आहे.

म्हादईचे आंदोलन क्षीण होत चालले आहे ते विरोधकांच्या अशा नकारात्मक रणनीतीमुळेच. वास्तविक एव्हाना हे आंदोलन पेटायला हवे होते, पण विरोधकांच्या छावणीत शांतता नांदत असल्यामुळे हे आंदोलन पेटण्यापूर्वीच विझते की काय, अशी शंका निर्माण व्हायला लागली आहे.

हे सर्व पाहता विधानसभेसारखेच लोकसभेतही भाजपची ‘बल्ले बल्ले’ होण्याची संभावना आतापासूनच व्यक्त होताना दिसत आहे. सगळे रस्ते भाजपकडेच जायला लागल्यावर आणखी दुसरे होणार तरी काय?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com