Learning: शिकायची सुरुवात - कुठे आणि कशी?

अनेकदा शाळेचा उल्लेख मुलाला भीती दाखवणे, वा शिस्त लावणे वा नियंत्रणात ठेवणे, शिक्षा देणे अशा एखाद्या हेतूने वा गंमत म्हणूनही मोठ्यांकडून केला जातो.
School
School Dainik Gomantak

नारायण भास्कर देसाई

मुलाच्या शालेय शिक्षणाचा प्रारंभ ही पालकांच्या दृष्टीने आनंदपर्वणी असते. आता आपले मूल शिकायला शाळेत जाणार याचे कौतुक आई-वडील, घरातील अन्य सदस्य, वडीलधारी मंडळी अशा साऱ्यांनाच असते.

खरे तर शाळा लहान मुलाच्या भाव-विश्वात आणि माहितीच्या भांडारात सहजपणे बरीच आधी दाखल झालेली असते - एक तर घरातील, शेजारील, भोवतालची वा नात्यातली मोठी मुले शाळेत जाताना बघून, ऐकून किंवा मोठ्यांच्या बोलण्यातून शाळा येते.

शाळेत जाणार ना, शिकणार ना, शाळेत जायला बॅग, बॉटल, बुक्स, बूट आणि सॉक्स, टाय आणि टिफिन बॉक्स् (हे सगळे शब्द आणि त्या प्रतिमा त्या मुलाच्या मूळ भाषेत आल्यास अगदीच मागास वाटू शकतात) आणायचे ना, अशा सगळ्या प्रश्नांतून शाळा आणि स्वतः यांचे चित्र मुलाच्या डोक्यात आकार घेते.

अनेकदा शाळेचा उल्लेख मुलाला भीती दाखवणे, वा शिस्त लावणे वा नियंत्रणात ठेवणे, शिक्षा देणे अशा एखाद्या हेतूने वा गंमत म्हणूनही मोठ्यांकडून केला जातो. एकूणच अशा उल्लेखांतून शाळा हे काही प्रमाणात भयकारक वा संकटाची चाहूल देणारे काहीतरी प्रकरण असावे, अशी बालमनाची समजूत कळत नकळत मोठ्यांमुळे होते.

शाळेत मुलाची भरती करण्याआधी शाळा-पूर्व तयारी होताना दिसते ती बहुतांश मुलांच्याबाबतीत याच प्रकारे! खरे तर हे सगळे मुलाच्या भाव-भावनांशी निगडित असल्याने त्यात शक्य तितके आनंदाचे, मजेचे, मुक्तीचे, मैत्रीचे वातावरण निर्माण करणे आवश्यक असते. कारण बालमनाला सुरक्षित, सुपरिचित कौटुंबिक वातावरणातून बाहेर निघताना अनोळखी,

अनिश्चित, अप्रिय असे काही जाणवल्यास त्यातून शाळेविषयी संदेह, शंका, भीती यांना संधी मिळून मुलाच्या वागण्या-बोलण्यात, आहार-विहारात, काही बाबतीत विचार-व्यवहारातदेखील त्यांचे प्रतिबिंब दिसते. यासाठीच पालक म्हणून मुलाच्या शाळा-प्रवेशाची तयारी भौतिक वस्तूंच्याऐवजी भावनिक सुरक्षेच्या अंगानेच जास्त करायला हवी.

कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा याबाबतही पालकांचे निकष वेगवेगळे असणारच. पण सर्वसाधारणपणे एकदा प्रवेश घेतला की पूर्ण शालेय शिक्षण एकाच संस्थेत, शक्यतो एकाच छताखाली व्हावे यासाठीचेच प्रयत्न पालक करताना दिसतात. आणि अशा ‘चांगल्या’, ‘उत्तम’ वा ‘आदर्श’ शाळा गावोगावी, दैनंदिन संपर्क सहज होऊ शकेल अशा अंतरावर असण्याची शक्यता कमीच.

मग मोठ्या, दूर अंतरावरच्या, सुसज्ज, प्रसिद्ध, प्रतिष्ठित आदी गुणविशेषांनी युक्त अशा शाळांसाठी प्रयत्न सुरू होतात. सध्या तर शिशुवर्ग वा बालवर्गात प्रवेशासाठी शिक्षक, संस्था-प्रमुख, स्थानिक पुढारी यांच्याद्वारे ओळख-वशिले, छोटे-मोठे सनदी अधिकारी, लोकप्रतिनिधी ते थेट मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या कार्यालयातूनही विनंती, आर्जव, अप्रत्यक्ष/ सूचक जाणीव वा धमकी, प्रलोभने आणि परस्परांचे व्यावहारिक हितसंबंध सांभाळण्याची भाषा यातील एक वा विविध मार्ग चोखाळण्यात पालकांना काहीच गैर वाटत नाही.

अलीकडच्या काळात माध्यमिक स्तरावर विद्यार्थी संख्येची निश्चिती करण्यासाठी स्वतःचा प्राथमिक विभाग आणि त्याच्या सुविहित संचालनाची हमी म्हणून पूर्व-प्राथमिक म्हणजेच प्राथमिक-पूर्व विभाग यांची व्यवस्था स्थानिक व्यवस्थापनांच्या अनुदानित शाळांनी केलेली आहे.

School
Mayem News: मयेतील कळसोत्सवाला गालबोट; उत्सव रद्द

यालाही आता चार दशके लोटली. म्हणजे आजच्या गोव्यात किमान तीन पिढ्यांचे शिक्षण गावची उत्तम चालणारी सरकारी प्राथमिक शाळा ओस पाडण्यातून आणि मुलाच्या शिक्षणाची एकदाच ‘कायमची व्यवस्था’ करण्याचे सूत्र सांभाळून घडले आहे. परिवार नियोजनाची प्रभावी कार्यवाही आणि शासकीय नोकरीसाठीचे स्थलांतर यांनी या गावोगावच्या प्राथमिक शाळांना मुलांचा तुटवडा जाणवावा अशी वाटचाल केलीच, पण पालक वर्गात वाढत गेलेल्या शैक्षणिक गुणवत्तेबाबतच्या गैरसमजुतींनीही त्यात भर घातली.

School
Dawarli News: कचरा समस्येवर तोडग्यासाठी पावले उचला : आमदार तुयेकर

आपले शिक्षण चांगले झाले नाही ही प्रामाणिक भावना, याला शाळा जबाबदार हा तर्क आणि आपण शिकलेल्या शाळेपेक्षा नवीन, दूरची, मोठी, नामांकित शाळा हाच आपल्या आणि मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा खरा उपाय, असे सोयीचे निदान या नवशिक्षित पालकांनी केले असले पाहिजे.

परिणामी, मुलाचा परिसर आणि परिवार यांच्या सुरक्षेपासून त्याला वेगळे काढण्याचे काम शिक्षणाच्या नावाने होत राहिले, आणि प्रसार माध्यमे, वाढते शहरीकरण, बदलती जीवनशैली, बाजारवाद आणि चंगळवाद यांच्या प्रभावा-दबावाखाली मुलांचे मातीपासून तुटणे, नातेसंबंधांच्या सहज-सुलभ संरक्षणाला पारखे होणे, जीवनात आणि वर्तनात कृत्रिमतेचे प्रस्थ वाढणे, आपल्या परिसराच्या विशिष्ट सांस्कृतिक परिवेशापासून फारकत घेणे हे सारे घडत गेले, घडत आहे.

एकूणच समाधानाचे अवकाश आणि भोवतालात रमत आनंदात जगण्याच्या संधी यांच्याशी फारकत घेत ही मुले वाढतात.

School
Goa Traffic Police: कुंकळ्ळीत 1001 जणांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

शैक्षणिक विचार आणि धोरण यांतून परिसर शाळा, शेजारची शाळा (नेबरहुड स्कूल) मुलांसाठी उत्तम मानली जाते, पण शासकीय आणि प्रशासकीय कारभार मात्र त्याच्या नेमका विरोधीच चालताना दिसतो. यात सर्वसामान्य पालकाच्या मुलाला चांगले शिक्षण परवडत नाही अशी स्थिती निर्माण होते, खरे तर पद्धतशीरपणे केली जाते. यात उच्चभ्रू, धनिक, प्रतिष्ठित, नवश्रीमंत अशा अनेकांचे योगदान असते.

जगण्यासाठी शिकणे, जगता जगता शिकणे, जगण्यातून शिकणे या सगळ्या बाबी गौण ठरून रोजच्या जगण्यापासून दूर राहून, जगण्याचे प्रश्न दुर्लक्षित करून, जीवनाचा विचार पूर्णपणे नाकारून ‘शिकवण्या’ची व्यवस्था मजबूत केली जाते. अशा शिक्षणात वर्षे, व्यवस्था, जीवनावस्था पार करता करता एक दिवस शिक्षण ‘पूर्ण’ केलेला परीक्षार्थी युवक आता काय करू?

असे विचारतो; आणि ‘आजवरच्या शिक्षणात हाच एक प्रश्न गौण वा अप्रस्तुत का मानला?’ असे त्याला विचारायचे धाडस फारसे कुणीच करत नाहीत. कारण प्रश्न, कुतूहल, जिज्ञासा, उत्सुकता जगण्याच्या सर्व संधीच समाजाने आणि व्यवस्थेने बासनात बांधून ठेवल्या आहेत. पण हे लक्षात कोण घेतो?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com