Goa Congress: दक्षिण गोव्‍यात काँग्रेसने कॅथोलिक उमेदवारच उभा करण्‍यासाठी दबाव

Goa Congress: हिंदू मतांचाही प्रश्‍न उपस्थित : काँग्रेसमध्‍ये दोन वेगवेगळे मतप्रवाह
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

Goa Congress:

दक्षिण गोव्‍यातील कॅथोलिक मतांची टक्‍केवारी कमी झाल्‍याने या मतदारसंघाचाही निकाल हिंदू मतांवरच अवलंबून असेल, असा मुद्दा पुढे करून ही हिंदू मते घेण्‍यासाठी काँग्रेसने दक्षिण गोव्‍यात हिंदू उमेदवारच उभा करणे आवश्‍‍यक आहे,

असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्‍ये जोर धरू लागलेला असतानाच या मतदारसंघात काँग्रेसने परंपरेप्रमाणे ख्रिस्‍ती उमेदवारच उभा करावा, यासाठी पक्षावर दबाव आणण्‍याचे काम सुरू झाले आहे. त्‍यामुळे दक्षिण गोव्‍यातील उमेदवार हिंदू असावा की ख्रिस्‍ती यावर काँग्रेसमध्‍ये दोन मते तयार झाली आहेत.

हिंदू मते काँग्रेसकडे वळविण्‍यासाठी हिंदू उमेदवार हवा, असा मतप्रवाह पुढे आल्‍यामुळे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांचे नाव पुढे आले होते. त्‍यानंतर आता विद्यमान प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांचेही नाव संभाव्‍य उमेदवार म्‍हणून घेतले जाते. सध्‍या अमित पाटकर हे दिल्‍लीत गेल्‍याने या चर्चेला अधिकच जाेर आला आहे.

Goa Congress
Comunidade: थिवी कोमुनिदादच्या माजी ॲटर्नीवर गुन्हा

मात्र, दुसऱ्या बाजूने काँग्रेसने ख्रिस्‍ती उमेदवार उभा केला नाही तर ख्रिस्‍ती समाजावर हा अन्‍याय, अशी भूमिका एक गट घेऊ लागला आहे. सध्‍या दक्षिण गोव्‍यासाठी काँग्रेस छाननी समितीने जी तीन नावे निश्‍चित केली आहेत. त्‍यात विद्यमान खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांच्‍यासह कॅप्‍टन विरियातो फर्नांडिस आणि गिरीश चोडणकर यांच्‍या नावांचा समावेश आहे.

कॅथोलिक मतदारांची संख्‍या जरी कमी असली तरी ही एकगठ्ठा काँग्रेसला पडणारी मते असून त्‍यामुळे दहा ते पंधरा टक्‍के हिंदू मते आपल्‍या बाजूने वळवली तरी दक्षिण गोव्‍यात काँग्रेसचा सहज विजय होऊ शकतो, असे मत राजकीय विश्‍लेषक आणि माजी आमदार ॲड. राधाराव ग्रासियस यांनी ‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या ‘साष्‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना व्‍यक्‍त केले. ते म्‍हणाले, आजपर्यंत या मतदारांनी काँग्रेसला कधीच नाकारलेले नाही. त्‍यामुळे त्‍यांना गृहित धरणे चुकीचे आहे. काँग्रेसने कॅथोलिक उमेदवार उभा केला नाही तर काँग्रेसला ते महाग पडू शकते.

Goa Congress
Goa Politics: दक्षिण गोव्यासाठी चोडणकरांची मोर्चेबांधणी

काँग्रेसने हा निर्णय घेतल्‍यास पर्याय म्‍हणून लोकांचा उमेदवार म्‍हणून तिसरा उमेदवार रिंगणात उभा राहू शकतो. काँग्रेसचे दक्षिण गोवा जिल्‍हाध्‍यक्ष सावियो डिसिल्‍वा यांनीही असेच मत व्‍यक्‍त केले. ते म्‍हणाले, काँग्रेसने आतापर्यंत दक्षिण गाेव्‍यात ख्रिस्‍ती उमेदवारच उभा केलेला आहे. त्‍यात काँग्रेसने बदल करू नये, असा विचार पुढे येऊ लागला आहे.

मी दक्षिण गोव्‍यात कित्‍येक ठिकाणी फिरतो. अगदी हिंदू काँग्रेस कार्यकर्तेही दक्षिण गोव्‍यात काँग्रेसने ख्रिस्‍तीच उमेदवार उभा करावा, असे मत व्‍यक्‍त करत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. डिसिल्‍वा हे मंगळवारी कॅप्‍टन विरियातो फर्नांडिस यांच्‍याबरोबर काणकोण दौऱ्यावर होते. पाळोळे येथे त्‍यांनी मच्‍छीमार समाजाच्‍या प्रतिनिधींची भेट घेतली. या प्रतिनिधींकडूनही काँग्रेसने आपल्‍या परंपरेत खंड पाडू नये, अशीच प्रतिक्रिया व्‍यक्‍त केल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com