पणजी: राज्यात कोविड - 19 च्या (Covid-19) मार्गदर्शक सूचनांत शिथिलता करण्यात आल्यापासून वाहतुकीची वर्दळ अधिक वाढली आहे. पर्यटकही वाहने घेऊन गोव्याकडे (Goa) येऊ लागले आहेत. त्यामुळे राज्यातील अपघातांचे प्रमाणही वाढू लागले आहे. यावर्षी आतापर्यंत 142 जणांचा रस्ता अपघातात (Accident) बळी गेला आहे. त्यामध्ये 97 दुचाकीस्वारांचा समावेश आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात 16 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी 15 टक्के रस्ता अपघातात वाढ झाली आहे.
गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर निर्बंध होते. त्यामुळे रस्ता अपघाताचे प्रमाण कमी होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून गोव्यात येणाऱ्यांना शिथिलता करण्यात आल्यापासून पर्यटक वाहने मोठ्या संख्येने येऊ लागली आहेत. राज्यात यावर्षी 22 सप्टेंबरपर्यंत 1986 अपघातांची नोंद झाली आहे.
वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 2020 या कोविड काळात राज्यात ऑगस्टपर्यंत 1522 अपघातांची नोंद झाली होती व 138 भीषण अपघात घडले होते. 145 जणांचा बळी गेला होता. त्यामध्ये 99 दुचाकीस्वार व 10 गाडीचालक तसेच 23 पादचारी ठार झाले होते. ठार झालेल्या दुचाकीस्वारांमध्ये 88 चालक व 11 सहचालक होते. त्या काळात 1522 रस्ता अपघातांची नोंद झाली होती. यावर्षी ऑगस्टपर्यंत रस्ता अपघाताचे प्रमाण अधिक असले तरी मृत्यू संख्या 133 आहे. 23 पादचारी ठार झाले आहेत, तर 96 दुचाकीस्वार ठार झाले त्यामध्ये 84 चालक व 12 सहचालकांचा समावेश आहे.
राज्यातील रस्त्यांवरील खड्डे तसेच अपघात प्रवण क्षेत्रेही अपघातास कारणीभूत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावरील रुंद रस्ते तसेच मानवी चुका त्यालाही तेवढ्याच जबाबदार आहेत. भरधाव वेग तसेच निष्काळजीपणाही सुद्धा अपघातामागील कारणे आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे अनेक दुचाकीस्वार अपघातात गंभीर जखमी होत आहेत.
अपघातप्रवण क्षेत्रांकडे दुर्लक्ष
ज्यातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत असले तरी अपघातप्रवण क्षेत्रांचे अभियांत्रिकरणाकडे अजूनही दुर्लक्ष केले जात आहे. दहा वर्षांपूर्वी राज्यात सुमारे 100 अपघातप्रवण क्षेत्रे निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी 10 टक्के क्षेत्रांचीच दुरुस्ती करण्यात आली आहे. रस्त्यावरील खड्डे हेही अपघाताला कारणीभूत ठरत आहेत, अशी माहिती वाहतूक खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.