म्हापसा: बार्देश (Bardesh) हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा तालुका असून, आपले वर्चस्व स्थानिक पातळीवर म्हणजे पंचायतींमध्ये असावे, असे प्रत्येक राजकीय नेत्याला वाटते. पंचायत निवडणूका (Panchayat Election) पक्षीय पातळीवर होत नसल्या तरी, राजकीय नेते हे यात सहभागी होतात आणि पंचायती आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्नही असतात. याच अनुषंगाने सध्या बार्देशात आजी-माजी लोकप्रतिनिधींनी एकमेकांविरोधात अप्रत्यक्षरित्या शड्डू ठोकला असून प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
बार्देश तालुक्यातील सहा जिल्हा पंचायतीत एकूण ३३ पंचायतींचा समावेश असून एकूण २७९ प्रभाग आहेत. प्रत्येक पंचायतीत पंचसदस्यांची संख्या भिन्न आहे. सर्वांत कमी पंच सदस्य हे नादोडा पंचायतीत आहेत, जी फक्त पाच सदस्यांची आहे. तर उर्वरित पंचायतींमध्ये ७, ९ तर जास्तीत जास्त ११ पंचसदस्य आहेत.
बार्देशात सात मतदारसंघ असले तरी केवळ सहा मतदारसंघांत पंचायती आहेत. तर म्हापशात नगरपालिका येते. त्यामुळे लोकप्रतिनिधी या सहा क्षेत्रातील पंचायतींवर वर्चस्वासाठी डावपेच आखताना दिसताहेत.
कळंगुट पर्यटन केंद्र म्हणून लोकप्रिय, तितकीच राजकीयदृष्ट्या कळंगुट पंचायत महत्त्वाची. सध्या आमदार मायकल लोबो यांची या मतदारसंघातील कळंगुट, कांदोळी, पर्रा, हडफडे-नागवा या चारही पंचायतींवर पकड दिसते.
दुसरीकडे पर्वरी मतदारसंघातील पर्वरी, सुकूर, साल्वादोर-दु-मुंद व पेन्ह-दी-फ्रान्स या पंचायतीं महत्त्वाच्या. याठिकाणी मंत्री रोहन खंवटे यांचे वर्चस्व आहे. त्यांनी साल्वादोर-दु-मुंदमधून आपले दोन उमेदवार हे बिनविरोध निवडून आणले आहेत.
तसेच मंत्री नीळंकठ हळर्णकर (Neelkanth Harnalkar) यांच्या थिवी मतदारसंघात थिवी, कोलवाळ, अस्नोडा, शिरसई या पंचायती महत्त्वाच्या. यातील काही पंचायतींवर हळर्णकर तर काही ठिकाणी माजी आमदार किरण कांदोळकरांची पकड आहे. त्यामुळे यावेळी हे दोघेही वर्चस्वाच्या प्रयत्नात दिसतील.
तसेच साळगाव मतदारसंघातील विविध पंचायतींवर आमदार केदार नाईक (MLA Kedar Naik) यांचे वर्चस्व दिसते.
कळंगुटचे आमदार मायकल लोबो (Calangute MLA Michael Lobo) यांनी तर थेट पंचायतीमध्ये आपली सक्रियता दाखविली आहे. कळंगुट, पर्रा, कांदोळी या पंचायतींमध्ये त्यांनी आपले पॅनेल उतरविले आहे. त्यांच्या विरोधात माजी सरंपच जोसेफ सिक्वेरा यांनी कळंगुटमध्ये पॅनेल उभे केले. तर पर्रा पंचायतमधून भाजपप्रणित ‘पर्रा युनायटेड’ नामक पॅनेल उभे केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.