पणजी: आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव (Archbishop of Goa) यांनी काल (गुरुवारी) राजभवनावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (P.S Sreedharan Pillai) यांची भेट घेतली. ही भेट निव्वळ सदिच्छा भेट नव्हती, तर त्यापलीकडील चर्चा करणारी होती, अशी माहिती मिळाली आहे.
केरळमधील एका बिशपांनी अन्य अल्पसंख्याक समाजातून ख्रिस्ती समुदायावर होत असलेल्या अन्यायाबाबत जाहीर वाच्यता केल्याने राष्ट्रीय पातळीवर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी पिल्लई यांनी बिशपांना तसे म्हणायचे नव्हते, ते वेगळ्या विषयी मांडणी करत होते असे सांगून चर्चेतील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला होता.
या साऱ्या पार्श्वभूमीवर आर्चबिशपांनी राज्यपालांची घेतलेली भेट ही त्याचमुळे केवळ सदिच्छा भेटीपलीकडील ठरली आहे. राज्यपालांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आर्चबिशप त्यांना पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी त्या भेटीची गणना सदिच्छा भेट या सदरात केली होती. त्यानंतर राज्यपाल पिल्लई हे आर्चबिशपांच्या निवासस्थानी जाऊन भेटले होते. त्यालाही सदिच्छा भेट असेच संबोधण्यात आले होते.
आता राज्यपालांनी विविध सामाजिक संस्था आणि डायलिसीस रुग्णांना विशेष निधीतून मदत जाहीर केल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी आर्चबिशप राज्यपालांना भेटले, असे राजभवनातून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले असले तरी आर्चबिशप आणि राज्यपाल यांची ख्रिस्ती समुदायाचे म्हणणे याविषयावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
वारंवार भेटी
निवडणुकीआधी मतदार जागृती व मतदार साक्षरता हे चर्च आपले कर्तव्य मानते. त्यामुळे प्रार्थनासभांतून मार्गदर्शन केले जाते. त्यातून मतदाररुपी भाविकांना मतदानाची नेमकी दिशा ठरवण्यास मात्र मदत होत असते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात तशी चर्चही भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. राज्यपाल आणि आर्चबिशप यांच्या अलीकडे वारंवार होऊ लागलेल्या भेटी त्याचमुळे चर्चेच्या ठरू लागल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.