ताळगाव येथील डोंगर कापून बांधलेल्या अलिशान बंगल्याचा मालक इस्टोनिया फ्रांसिस्को आल्मेदा हा 35 लाख रुपये जमा करण्यास असमर्थ ठरल्याने त्याच्या मालकीच्या कोट्यवधी किमतीच्या दोन्ही गाड्या गोव्याबाहेर नेल्या जाणार नाहीत, अशी हमी त्याने गोवा खंडपीठाला दिली आहे.
येत्या 5 मार्चपर्यंत थकबाकीची रक्कम जमा न केल्यास भू-महसूल संहितेनुसार त्याच्या मालमत्तेतून ती वसूल केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बंगल्याच्या मालकाला दिला आहे.
बेकायदेशीरपणे डोंगर कापून आलिशान बंगल्याच्या बांधकामामुळे तेथील डोंगराला धोका निर्माण झाला आहे. त्याच्या संरक्षणासाठी तेथे संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यापूर्वी ६० लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे निर्देश खंडपीठाने बंगल्याचा मालक आल्मेदा याला दिले होते.
त्याला थकबाकीची रक्कम 35 लाख जमा करण्यास सोमवारपर्यंत (26फेब्रुवारी) मुदत दिली होती. बँकांंशी कर्जासाठी संपर्क साधूनही थकबाकीची जमा करावयाची असलेली रक्कम जमा करणे शक्य नसल्याची माहिती त्याने खंडपीठाला दिली.
दरम्यान, एनजीपीडीएने दिलेल्या आराखड्यानुसार डोंगर कापणी केलेली जागा पूर्वस्थितीत करण्यात येईल, अशी हमी आल्मेदाने दिली होती, त्याचेही उल्लंघन केले आहे.
महागड्या गाड्या
बंगल्याचा मालक 35 लाख रुपये जमा करण्यास त्याच्याकडे रक्कम नसल्याचे सांगत असला तरी त्याच्याकडे रेंज रोव्हर कार व बीएमडब्ल्यू अशा महागड्या गाड्या आहेत. त्याची छायाचित्रे याचिकादाराच्या वकिलांनी खंडपीठासमोर सादर केली.
याशिवाय बेकायदा डोंगर कापून बनवण्यात आलेल्या आलिशान बंगल्याचा आल्मेदा मालक आहे. त्याच्या मालमत्तेतून ही रक्कम वसूल करणे शक्य आहे, अशी बाजू याचिकादाराचे वकील रोहित ब्रास डिसा यांनी मांडली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.