Morjim Gramsabha मागील वीस वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाने मोरजी पंचायत क्षेत्रातील कान्नाईक वाडा येथील रस्ता डांबरीकरण केला होता.
पण आता तीन मीटर रुंदीचा रस्ता श्रीकांत कान्नाईक यांनी अडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. या मुद्द्यावरून आजच्या ग्रामसभेत वादळी चर्चाही झाली.
कान्नाईक वाडा, तेमवाडा या भागातील काही मंडळी या मार्गाचा वापर करत होते. पण जमीन मालक श्रीकांत कान्नाईक यांनी हा रस्ता अडवल्याची तक्रार ग्रामस्थांनी मोरजी पंचायत, पेडणे उपजिल्हाधिकारी, पेडणे पोलिस स्टेशन यांना दिली आहे.
आजच्या मोरजी ग्रामसभेत ग्रामस्थांनी या रस्ता मोकळा करण्याविषयी जोरदार मागणी केली. ग्रामसभेनंतर सरपंच सुरेखा अमित शेटगावकर, उपसरपंच पवन मोरजे यांच्यासह पंचसदस्यांनी रस्त्याकडे जात श्रीकांत यांच्याशी चर्चा केली, पण त्यांनी रस्ता मोकळा न करण्याची भूमिका घेतली.
दरम्यान, दोन दिवसांच्या आत सार्वजनिक रस्ता खुला झाला नाही, पुढील घटनेस सरकार जबाबदार राहिल, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
पूर्ण पंचायत मंडळ आणि ग्रामस्थांनी या रस्त्याला भेट दिली असता रस्ता अडवण्याचा प्रयत्न झाला आहे, असे समजले. आम्ही जमीन मालकाकडे चर्चा केली. परंतु तो काही ऐकायला तयार नाही. त्यामुळे पुढील जी काही घटना घडणार आहे, त्याविषयी सरकारने योग्य तो तोडगा काढावा.
- पवन मोरजे, उपसरपंच
त्यावेळी हा रस्ता आपण इतरांसाठी नव्हे तर आपल्या घरासाठी केला होता. लोकांच्या गणेश विसर्जनासाठी अडचणी असेल तर आपण दीड मीटरची पायवाट सोडली. रस्त्यासाठी आपण कधीच ना हरकत दाखला दिलेला नाही. त्यामुळे आपण हा रस्ता मोकळा करणार नाही
- श्रीकांत कान्नाईक, जमीन मालक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.