कळंगुट: ज्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी भाजपची पाळेमुळे राज्यात रोवली, त्याच श्रमिक कार्यकर्त्यांना आज पक्षाबाहेर हाकलले जात आहे. इतकेच नव्हे, तर भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांकडून स्व. मनोहर पर्रीकर यांच्या विचारधारेला बाहेरचा रस्ता दाखविण्याचा खटाटोप चालू आहे, परंतु पर्रीकरांचा (Manohar Parrikar) वारसा पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कळंगुटचे आमदार तथा राज्याचे मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांनी काणका-वेर्लात केले.
लोबोंना येत्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) भाजपकडून तिकीट नाकारण्यात येणार असल्याच्या वावड्या उठत असल्याने आपण कुठल्याही राजकीय परिस्थितीला तोंड देण्यास तयार असल्याचे मंत्री लोबो यांनी यावेळी सांगितले. पर्राच्या सरपंच तथा शिवोली मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्यास सज्ज असलेल्या त्यांच्या पत्नी डिलायला लोबो यांच्या काणका-वेर्ला येथील प्रचार कार्यात सहभागी असलेल्या मंत्री लोबो यांनी वरील वक्तव्य केले. यावेळी काणका-वेर्लाच्या सरपंच अमिता कोरगावकर, माजी झेडपी अध्यक्ष वासुदेव कोरगावकर, काणका-वेर्लाचे पंचायत मंडळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवोली विकासापासून वंचित राहिल्यामुळेच आज स्थानिक मतदार क्रांती घडवून आणण्यासाठी उभे ठाकलेले आहेत आणि एकसंध होऊन आपल्यासोबत असल्याचा मंत्री लोबो यांनी दावा केला. शिवोलकरांना केवळ त्यांच्या प्राथमिक गरजा पुरविण्याची गरज आहे. ही गोष्ट आजपर्यंत घडली असती, तर लोक रस्त्यावर उतरले नसते. राज्यात नवनवीन प्रकल्प आणले म्हणून राज्याचा विकास होत नसतो, तर शेवटच्या माणस़ापर्यत जोपर्यंत त्यांच्या प्राथमिक गरजांचा स्त्रोत पोहचत नाही, तोपर्यंत गावचा विकास झाला असे म्हणता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
‘पक्षाचे व्यावसायीकरण तत्काळ रोखा’
भाजपमधून (BJP) याआधी हकालपट्टी करण्यात आलेल्या लोकांचा सध्या पक्षात हेकेखोरपणा चाललेला आहे. त्यामुळे केंद्राकडून सर्वप्रथम अशा लोकांवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले. तसेच पक्षाचे होत असलेले व्यावसायीकरण तत्काळ रोखण्याची त्यांनी मागणी केली.
‘फॅमिली राज’बाबत आम्हालाच परक्याची वागणूक का?’
भाजपच्या ‘फॅमिली राज’बाबत बोलताना बाबू कवळेकर तसेच मोन्सेरात यांना एक न्याय, तर लोबो दांपत्याला दुसरा न्याय असे परक्याच्या भूमिकेचे पक्षाचे धोरण कसे काय होऊ शकते असा प्रश्न लोबो यांनी भाजपच्या श्रेष्ठींना केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.