I-League Football: अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) लीग समितीने आगामी आय-लीग फुटबॉल स्पर्धेची रुपरेषा निश्चित केली आहे. 2023-24 मोसमापासून स्पर्धेत 13 संघांत विजेतेपदासाठी चुरस असेल. इंटर काशी आणि नामधारी एफसी या संघांना ‘कॉर्पोरेट’ गटातून थेट प्रवेश देण्यात आला.
एआयएफएफ लीग समितीची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी राज्याचे प्रतिनिधित्व केले. एआयएफएफ सचिव डॉ. शाजी प्रभाकरन यांनी बैठकीत सांगितले, की ‘‘प्रमुख निर्णय झालेले असल्याने ही बैठक खूप महत्त्वाची आहे. आमच्या लीग पद्धतीला आकार आला आहे. केवळ आय-लीगसाठी नव्हे, तर तृतीय विभागात खेळण्यासाठी अधिकाधिक क्लब इच्छुक आहेत.’’
एकूण 156 सामने
2023-24 मधील आय-लीग स्पर्धा 13 संघांत खेळली जाईल. सहभागी क्लबना परवाना प्रक्रिया निकष पूर्ण करावे लागतील. होम-अवे द्विसाखळी पद्धतीने स्पर्धा खेळली जाईल. एकूण 156 सामने होणार असून प्रत्येक क्लबला 24 सामने खेळावे लागतील. गुणतक्यातील अव्वल संघ आय-लीग विजेता ठरेल आणि त्या संघाला 2024-25 मधील इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत बढती मिळेल, मात्र पात्र क्लबला आवश्यक परवाना निकष पूर्तता बंधनकारक असेल.
यंदा दोन नवे संघ
गतमोसमात पंजाब एफसीने आय-लीग स्पर्धा जिंकून 2023-24 मधील आयएसएल स्पर्धेत पदोन्नती मिळविली. 2022-23 मधील आय-लीग स्पर्धेत तळाचे दोन संघ मुंबई केंकरे एफसी व सुदेवा दिल्ली एफसी संघांची खालच्या लीगमध्ये पदावनती झाली.
द्वितीय विभागीय लीगमधील पहिले दोन संघ अनुक्रमे दिल्ली एफसी व शिलाँग लाजाँग संघ यावेळच्या आय-लीग स्पर्धेसाठी पात्र ठरले, तर इंटर काशी व नामधारी एफसी या दोन नव्या संघांना कॉर्पोरेट गटातून आय-लीगमध्ये स्थान मिळाले.
गोव्यातील संघालाही संधी
‘एआयएफएफ’ने तृतीय विभागीय लीगची निर्मिती केली आहे. या स्पर्धेसाठी संघ पाठविण्यासाठी नऊ राज्य फुटबॉल संघटना पात्र ठरल्या आहेत, त्यात गोव्याचाही समावेश आहे. छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान व महाराष्ट्रातील संघ तृतीय विभागीय लीगमध्ये खेळतील. सध्या आय-लीग या मुख्य स्पर्धेत गोव्यातील चर्चिल ब्रदर्स हा एकमेव संघ आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.