पेडणे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यातच ओमिक्रॉन व्हेरिएंटने पुन्हा राज्य सरकारच्या चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे पत्रादेवी चेकनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं आहे. त्यामुळे गोव्यात न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी येणाऱ्या पर्यटकांचे मोठे हाल होत आहेत.
पत्रादेवी (Patradevi) चेक नाक्यावर कमी मनुष्यबळ, कमी पोलीसदल आणि कोरोना टेस्ट करण्याची यंत्रणाही कुचकामी ठरत असल्याने प्रवाशांना ताटकळत राहावे लागत आहे, पर्यटकांसाठी याठिकाणी सरकारने कोणतीही सोय केली नाही, त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतात असा प्रश्नही विचारला जात आहे.
कोरोनाचे नियम (Restrictions) केले ते कुणासाठी आणि त्याची अंमलबजावणी का होत नाही, ते कागदावरच आहेत का, त्याची कार्यवाही करताना सरकारी यंत्रणा कमी पडताहेत का असा सवालही प्रवाशांमधून विचारला जात आहे. मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात प्रवेश करत आहेत.
पेडणे तालुक्यात पत्रादेवी, किरणपाणी, न्हयबाग असे तीन चेकनाके आहेत, त्यापैकी पत्रादेवी या चेकनाक्यावर सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी आणि कोरोना चाचणी केली जाते. इतर नाक्यावर कोणत्याच सुविधा आणि सोयी नाही, त्यामुळे याठिकाणी कोणतीही तपासणी केली जात नाही.
या नाक्यावर एकाचवेळी 200 ते 300 प्रवासी रांगेत उभे असल्याने पोलिसांना यावर नियंत्रण मिळवताना अडचणी येत आहेत. शिवाय कोरोना टेस्ट करणारी यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचं चित्र आहे. एक डोस घेतला तर या ठिकाणी चाचणी करण्यासाठी जी खाजगी आरोग्य केंद्रे आहेत त्या ठिकाणी 250 रुपये फी आकारली जाते. याही केंद्रात कर्मचाऱ्यांची उणीव भासत आहे, शिवाय पोलीस दलाची संख्या कमी असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांना बरीच कसरत करावी लागते.
या नाक्यावरून परराज्यातील हजारो पर्यटक वाहने घेऊन येतात. चेकनाक्यावर प्रवासी आपल्याकडे कोरोना प्रमाणपत्र आहे की नाही यांची नोंद करण्यासाठी गर्दी करतात. त्या ठिकाणी दोन खाजगी आरोग्य केंद्रांकडून कोरोना चाचणी केली जाते. शिवाय तिथेही अडगळीत आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. एकेका पर्यटकाची टेस्ट करण्यासाठी 15 ते 20 मिनिटे जात असल्याने गर्दी वाढत आहे. शिवाय मनुष्बळ कमी असल्याने गर्दीत भर पडत आहे.
पत्रादेवी चेकनाक्यावर पहाटे साडेपाच सहा वाजल्यापासून प्रवासी बसेस यायला सुरुवात होते, एकामागून एक प्रवासी बसेस येयून रांगा करतात , आपल्याकडे असलेल्या कोरोना प्रमाणपत्राची तपासणी करतात, एखाद्या प्रवाश्याकडे कोरोना दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र नसल्याने त्याना रांगेत राहून टेस्ट करावी लागते, एकामुळे शेकडो प्रवाश्याना ताटकळत राहावे लागते, चाचणी करण्यासाठी जी गर्दी असते तिथे कुणीच सोशल डिस्टन्सिंग ठेवत नाही किंवा तोंडावर मास्कही घालत नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.