मडगाव : कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरुन जाणाऱ्या विजेच्या हायटेन्शन तारा तुटून खाली पडल्याने मडगावच्या सोनसोडो कचरा यार्डाने पुन्हा पेट घेतला आहे. या यार्डच्या सभोवताली राहणाऱ्या लोकांच्या 2019 च्या भीतीदायक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. (Huge fire in Sonsodo Garbage Yard News Updates)
प्रत्यक्षदर्शी कडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 11 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. यावेळी सोनसोडो (Sonsodo) कचरा यार्डातून अचानक धूर वर येताना दिसू लागल्यावर काही जणांनी पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांना सतर्क केले. त्यांनी अग्निशमन दलाला त्याची कल्पनाही दिली. पण नंतर सूर्य माथ्यावर येऊन ऊन वाढू लागल्यावर ही आग भडकली आणि कचऱ्याने पेट घेतला.
दुपारपर्यंत ही आग भडकली होती. त्यातच दुपारपर्यंत अग्निशमन दलाच्या फक्त दोनच गाड्या तिथे पोहोचू शकल्याने आग (Fire) विझवण्याच्या कामात थोडीशी दिरंगाई झाल्याची तक्रार येथे करण्यात येत होती.
मडगावचे नगराध्यक्ष लिंडन परेरा हे या ठिकाणी येऊन त्यांनी पाहणी केली. या दुर्घटनेला सर्वस्वी वीज खातेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. 2019 च्या दुर्घटनेनंतर कचऱ्यावरून जाणारी उच्च दाबाच्या वीज तारा दुसरीकडे हलवाव्यात अशी आम्ही वीज खात्याकडे मागणी केली होती. मात्र त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही असे ते म्हणाले.
2019 च्या मे महिन्यात अशाच प्रकारे तार कचऱ्यावर पडून कचऱ्याने (Garbage) पेट घेतला होता. ही आग सतत सात दिवस घुमसत होती. त्या आगीच्या धगात हा सारा परिसर होरपळून निघाला होता. 2020 मध्ये या कचऱ्याच्या राशी साफ करण्यासाठी निरीक्षण चालू असताना वीज तारांशी एका कामगाराचा संपर्क आल्याने पुन्हा आग पेटली होती आणि तो कामगारही गंभीर जखमी झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.