पणजी: आरएसएस गोव्याचे माजी अध्यक्ष सुभाष वेलिंगकर यांनी संत फ्रान्सिस झेवियर यांच्या डिएनए चाचणीची मागणी केल्याने गेल्या दोन दिवसांपासून गोव्यात वाद होत आहे.
वेलिंगकर यांनी केलेल्या मागणीप्रकरणी त्यांच्या अटकेची मागणी ख्रिस्ती समाजाकडून केली जात आहे. ख्रिस्ती समाजाकडून राज्यभरात पोलिस स्थानकांवर मोर्चे काढले जात आहेत. तर, हिंदुवादी संघटना वेलिंगकरांच्या समर्थनात रस्त्यावर उतरल्या आहेत.
वेलिंगकरांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालीय. दरम्यान, शुक्रवारी रात्री डिचोली पोलिस स्थानकात ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. आपचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
गोवा मुक्तीसाठी बलिदान दिलेल्यांचे स्मरण करताना हिंदू रक्षा महाआघाडीचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी संत फ्रान्सिस झेवियर यांच्या डिएनए चाचणीची मागणी केली. वेलिंगकरांच्या मागणीवर राज्यभऱातून आक्षेप घेण्यात आला. राजकीय नेत्यांनी देखील थेट विरोध दर्शवला.
माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी सर्वात पहिल्यांदा कोलवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करुन कारवाईची मागणी केली. त्यापाठोपाठ वॉरन आलेमाव यांच्यासह विविध ठिकाणी ख्रिस्ती समाजाकडून वेलिंगकरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
वेलिंगकरांच्या अटकेच्या मागणीने शुक्रवारी जोर धरला. शुक्रवारी राज्यात विविध ठिकाणी मोर्चे निघाल्यानंतर शनिवारी देखील डिचोली, मडगाव, फातोर्डा आणि राजधानी पणजीत ख्रिस्ती समाजाकडून मोर्चे काढण्यात आले आहेत.
सुभाष वेलिंगकरांना अटक न केल्यास मडगाव बंदची हाक मोर्चेकरी कॅथलिक समाजाने दिली आहे. शनिवारी सकाळपासून मोठ्या संख्येने समाजातील नागरिक कोलवा सर्कलच्या दिशेन मार्च करण्यास सुरुवात केली आहे.
दुसरीकडे, वेलिंगकरांच्या समर्थनात हिंदुवादी संघटना देखील रस्त्यावर उतरल्या आहेत. हिंदुवादी कार्यकर्त्यांनी डिचोली पोलिस स्थानकाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, राज्यात धार्मिक तेढ निर्माण झाला असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मौन बाळगत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.