IFFI 2023 : पणजी, ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या काल श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअमवर झालेल्या समारोप सोहळ्यात हिमाचल प्रदेशच्या सिमला हेडक्वाटर्सच्या पोलिस पथकाने सादर केलेल्या ऑर्केस्ट्रावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत खूपच खूष झाले.
यावेळी त्यांनी खास स्टेजवर जाऊन या पोलिसांचे कौतुक केलेच, शिवाय पुढील वर्षीच्या ‘इफ्फी’त गोवा पोलिस ऑर्केस्ट्रा सादर करतील, अशी घोषणाच करून टाकली आणि उपस्थित गोवा पोलिस अवाक झाले. आतापासूनच आम्हाला तयारीला लागावे लागेल, अशी चर्चाही यावेळी त्यांच्यात सुरू झाली.
हिमाचल प्रदेशच्या पोलिसांनी यावेळी देशक्तीपर गीते सादर करून उपस्थित सिनेरसिकच नव्हे, तर देशासह जगभरातून आलेल्या चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री आणि चित्रपट उद्योगाशी संबंधित सर्वांच्या मनात देशभावना जागविल्या.
समारोप सोहळ्यानंतर हिमाचल प्रदेशमधून आलेल्या व पिळदार मिशा असलेल्या पोलिसांसोबत सेल्फी घेण्याचा अनेकांना मोह आवरला नाही.
हिमाचल पोलिसांनीही व्यासपीठाच्या खालच्या आवारात उपस्थित राहून सेल्फी काढायला देऊन सिनेरसिकांच्या भावनांना दाद दिली. यावेळी उपस्थित समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनीही या पोलिसांचे अभिनंदन केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.