डिचोली: गेल्या जवळपास बावीस दिवसांपासून कहर केलेल्या पावसाने आता अक्षरशः रुद्रावतार धारण केला आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाने धुमाकूळ घालताना डिचोलीतील बहुतेक भागात झोडपून काढले. डिचोली शहरासह बाजाराला पुराने वेढा दिला आहे. पावसाचा जोर चालूच राहिल्यास डिचोलीवर मोठे संकट येणार आहे. त्यात हवामान खात्याने ''रेड अलर्ट'' जाहीर केल्याने नागरिकांत धडकी भरली आहे.
गुरुवारी सकाळपासून अचानक पाणी वाढून डिचोली शहरासह बाजारात पाणी घुसले. दुपारपर्यंत पाणी वाढत गेल्याने बाजारातील दुकानदार, व्यापाऱ्यांवर आकांत कोसळला. काही दुकानांत पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांत एकच हाहा:कार उडाला. खबरदारीचा उपाय म्हणून काही दुकानदारांनी दुकानातील साहित्य बाहेर काढले. डिचोली शहराला पुराने वेढा दिला असला, तरी दुपारपर्यंत स्थिती नियंत्रणात होती. कोणतीही आपत्ती ओढवली नव्हती.
मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. बहुतेक भागात जलमय चित्र दिसून येत आहे. डिचोलीसह अन्य नद्यांही धोक्याची पातळी गाठली असून नदीचे पाणी बाहेर फुटू लागले आहे. डिचोलीसह बहुतेक भागात नदीचे पाणी घुसले. येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळ तर सकाळीच रस्ता पाण्याखाली गेला होता. तसेच त्या ठिकाणी असलेले गाडे तसेच पार्क करून ठेवलेली वाहनेही पाण्याखाली गेली होती. शाळा सकाळी लवकर सोडण्यात आल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.