Bicholim News : एकाच रात्री दोन मंदिरे फोडली; डिचोलीत खळबळ

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही मंदिरे फोडली असावीत, असा अंदाज आहे. महिन्यापूर्वी डिचोली शहरात एकाच रात्री चार मंदिरे फोडण्यात आली होती.
Bicholim temple
Bicholim templeDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली, शहरात पुन्हा एकदा मंदिरे फोडणारी टोळी सक्रिय झाली असून बुधवारी एकाच रात्री दोन मंदिरे फोडण्यात आली. पूर्वीच्या पोलिस स्थानक इमारतीजवळील आणि बाजारातील मंदिरांत ही चोरी झाली. ही दोन्ही देवस्थाने जागृत दैवत श्री कोटेश्वर देवाची आहेत.

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही मंदिरे फोडली असावीत, असा अंदाज आहे. महिन्यापूर्वी डिचोली शहरात एकाच रात्री चार मंदिरे फोडण्यात आली होती. आता पुन्हा दोन मंदिरे फोडण्यात आल्याने शहरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

बुधवारी रात्री अज्ञात चोरांनी बाजारातील श्री कोटेश्वर देवस्थान मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून फंडपेटी फोडली. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी बाजारातील व्यापारी देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले असता, चोरीचा हा प्रकार निदर्शनास आला.

फंडपेटीत नेमकी किती रक्कम होती, ते समजू शकले नाही. तसेच चोरांनी पूर्वीच्या पोलिस स्थानकाच्या मागे असलेल्या श्री कोटेश्वर देवाचे देऊळही लक्ष्य केले. मुख्य दरवाजा तोडून या देवळातील फंडपेटी चोरांनी पळवली.

याप्रकरणी तक्रार नोंद करण्यात आल्यानंतर डिचोली पोलिसांनी पंचनामा केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विराज धाऊसकर याप्रकरणी तपास करीत आहेत. दोन्ही मंदिरात सीसी टिव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था नसल्याने तपासकामात अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान, मध्यरात्री दोघेजण श्री कोटेश्वर मंदिराकडून बाजाराच्या दिशेने जातानाचे दृष्य दोन दुकानातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. मंदिरफोडी प्रकरणात त्यांचा हात आहे की नाही, त्यादृष्टीने तपास सुरु आहे.

Bicholim temple
Goa Legislative Assembly : वसुलीविना वेदांताला निर्यात परवानगी; खाणप्रश्‍नावरून युरी आक्रमक

पोलिस गस्त वाढवण्याची मागणी

गेल्या वर्षी मंदिरे फोडणाऱ्या चोरांनी डिचोलीत धुमाकूळ घातला होता. लाडफे, कासारपाल, भटवाडी-उसप, सर्वण, मुळगाव या भागात मंदिरे फोडली होती. गेल्या महिन्यात चोरांनी पुन्हा आपल्या कारवाया सक्रिय करताना एकाच रात्री चार मंदिरे फोडली होती.

आता पुन्हा मंदिरे फोडण्याच्या घटना घडू लागल्याने डिचोलीत पुन्हा मंदिरे फोडणारी टोळी कार्यरत असावी, असा संशय वर्तविण्यात येत आहे. डिचोली शहरात रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. श्री कोटेश्वर देवस्थान समिती तसेच बाजारातील व्यापाऱ्यांनी तशी मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com