Goa Traffic Rule नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना थेट ऑनलाईन पद्धतीने ई-चलन देण्याच्या कारवाईला आज, गुरुवारपासून सुरुवात झाली. सध्या 13 ठिकाणी ही कारवाई सुरू झाली असून मेरशी येथील जंक्शनवर जास्त प्रमाणात नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले आहेत.
या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कनेक्टिव्हिटी आल्तिनो येथील आयटी हबमध्ये असलेल्या कंट्रोल रूममध्ये आहे. या ठिकाणी 13 ठिकाणी सुरू असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे क्रमांक ही यंत्रणा टिपत असून त्यानुसार ई-चलन संबंधित वाहनचालकांना पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या कंट्रोल रूममध्ये वाहतूक खात्याचे दोन कर्मचारी तसेच पोलिसांसह ही यंत्रणा हाताळणाऱ्या कंपनीचे काही कर्मचारी देखरेख ठेवत आहेत. आज पहिलाच दिवस असल्याने ही यंत्रणा हाताळताना काही अडथळा येत होता.
मात्र, येत्या काही दिवसांत ती सुरळीत होऊन दरदिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना चलन दिले जाणार आहे. आजपासून ही यंत्रणा सुरू होणार असल्याचे माहीत असूनही काही वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
हे सीसीटीव्ही कॅमेरे जंक्शनपासून साधारण १०० मीटरवरील वाहनांच्या क्रमांकपट्टीचे चित्र टिपू शकतात.
कंट्रोल रूममधून वाहन चालविताना हेल्मेट न वापरणे, सिग्नल तोडून जाणे, सिग्नलच्या ठिकाणी वाहन थांबण्याची रेषा ओलांडून उभे राहणे किंवा झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यावर वाहन उभे करणे, दुचाकीवर क्षमतेपेक्षा अधिकजण स्वार असणे, चारचाकीतील चालक वा सहचालकाने सीट बेल्ट न लावणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा विविध प्रकारचे नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन केलेल्या छायाचित्रांची प्रत पुराव्यासह चलनसोबत पाठवण्यात येते. हे चलन वाहन नोंद असलेल्या मालकाच्या मोबाईलवरील व्हॉटस ॲप किंवा इमेलवर नियमाचे उल्लंघन केल्यापासून काही मिनिटांतच पाठवले जाते. हे दोन्ही पर्याय नाही, त्या वाहनमालकांना त्यांच्या घरच्या पत्त्यावर हे चलन पाठवले जाते.
दरम्यान, वाहतूक खात्याने १० स्पीड रडार गन्स वाहतूक पोलिसांकडे सुपूर्द केली होती. ही सर्व यंत्रे आजच मिळाली आहेत. त्यांचे वितरण दोन-तीन दिवसांत केले जाणार आहे.
या स्पीड रडार गन्स राष्ट्रीय व राज्य महामार्ग असलेल्या कक्षेतील वाहतूक पोलिस कक्षाला देण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिस अधीक्षक बॉस्युएट सिल्वा यांनी दिली.
गन्ससह तीन वाहने
सध्या वाहतूक पोलिसांकडे 13 स्पीड रडार गन्स आहेत. नवीन 10 रडार गन्स सुपूर्द केल्या असल्या, तरी त्यांचा वापर अद्याप सुरू केलेला नाही. 13 पैकी फक्त 4 गन्स चालू स्थितीत आहेत. केंद्राच्या रस्ता सुरक्षा निधी योजनेतून वाहतूक पोलिसांना स्पीड रडार गन्स बसविलेली 3 वाहने मिळणार आहेत.
महामार्गांवर वेगमर्यादेचे फलक असूनही नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे महामार्गावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्यामुळे चालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे.
- बॉस्युएट सिल्वा, वाहतूक पोलिस अधीक्षक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.