परतीच्या पावसाने घातला 'धुमाकूळ'! रस्ते पाण्याखाली, दरड कोसळली, झाड कोसळून नुकसान; लोकांची पळताभुई

Goa Weather: पहाटेपासून पावसाने कहर केल्याने अनेक रस्‍ते पाण्‍याखाली गेले, काही ठिकाणी पडझड झाली. सकाळच्‍या सत्रात जनजीवन विस्‍कळीत झाले.
Goa Weather: पहाटेपासून पावसाने कहर केल्याने अनेक रस्‍ते पाण्‍याखाली गेले, काही ठिकाणी पडझड झाली. सकाळच्‍या सत्रात जनजीवन विस्‍कळीत झाले.
Goa Monsoon|Goa RainDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon Latest News

पणजी: वायव्‍य राजस्‍थान व कच्‍छ भागातून नैऋत्‍य मान्‍सूनच्‍या माघारीला सुरवात झाल्‍यावर गोव्‍यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पुढील काही दिवस हीच स्‍थिती राहील. हवामान विभागाने सोमवार जारी केलेला पर्जन्‍य ‘रेड अलर्ट’नुसार मुसळधार पाऊस झाला. पहाटेपासून पावसाने कहर केल्याने अनेक रस्‍ते पाण्‍याखाली गेले, काही ठिकाणी पडझड झाली. सकाळच्‍या सत्रात जनजीवन विस्‍कळीत झाले. राजधानी पणजीतील पाटो परिसर, आंबेडकर उद्यान तसेच अटल सेतूवरूनही मोठ्या प्रमाणात धबधबासदृश पाणी वाहत होते. सत्तरीसह म्हापसा, वास्को, डिचोली, काणकोण, मडगाव, पेडणे आदी शहरी भागांतही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.

पेडणे मासळी बाजारात पाणी

जोरदार पावसामुळे मासळी मार्केटमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने मासे विक्रेत्या महिलांची धावपळ उडाली. मासे विक्रेत्या काही महिलांनी आपल्या मासळीच्या टोपल्या इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलविल्या.

मासळी मार्केटजवळून जाणाऱ्या गटारातील पाणी वरती येऊन पाण्याची पातळी वाढत गेली व पाणी मासळी मार्केटमध्ये घुसले. मार्केटमध्ये अशा प्रकारे पाणी घुसल्याने मासळी मार्केटच्या एका बाजूने गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे मासळी विक्रेत्यांची भांडीही पाण्यात तरंगू लागली.

आंबेडकर उद्यान परिसरही जलमय

सकाळी हलक्या सरींनी सुरूवात झाल्यानंतर नऊच्या सुमारास जोरदार सरींना प्रारंभ झाला. काही वेळातच कंदब बसस्थानकापासून जवळ असणारा आंबेडकर उद्यान परिसर जलमय झाला. जोरदार पावसात काही वेळातच आंबेडकर उद्यानासमोरील रस्ते पाण्याखाली जाण्याचे प्रकार नित्याचे झाले असले तरी त्यावर अद्यापि कायमचा उपाय कधी निघणार आहे, याची चिंता येथील व्यावसायिकांना लागून आहे.

प्रत्येक पावसाळ्यात जोरदार वृष्टी झाल्यानंतर पणजीतील पाणी साचण्याच्या ठिकाणांमध्ये कदंब बसस्थानक परिसर, डॉ. आंबेडकर उद्यान, पाटो परिसराचा समावेश होतो.

तोरसेतील महामार्गावर पाणीच पाणी

तोरसे हायस्कूल जवळील जो उड्डाणपूल आहे. त्या उड्डाण पुलावरून पत्रादेवीमार्गे तोरसे-पेडणे जाणारी वाहने गतीने जात असतात. या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकी वाहन चालकांना याचा बरा त्रास होत असतो. सरकारने आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने यावर लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तोरसे हायस्कूल जवळील हा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे. या जंक्शनवर आतापर्यंत अनेकांचे बळी गेलेले आहेत. या हायस्कूलसाठी येणारी जाणारी विद्यार्थी शिक्षक या रस्त्याचा वापर करत असतात. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मडगाव परिसरातील रस्ते जलमय!

पावसामुळे आज मडगावात अनेक रस्ते जलमय झाले होते. दुचाकीवरून मुलांना पोचविणाऱ्या पालकांनी चार चाकी वाहनांचा उपयोग केल्याने शाळांसमोर वाहनांची रांगच दिसत होती. दक्षिण गोवा इस्पितळासमोरचा रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रुग्णांना बराच त्रास झाला. चंद्रवाडा-फातोर्डा येथे रस्त्यावरून पाणी वाहत होते. काही घरांनी सुद्धा थोड्या फार प्रमाणात पाणी शिरले.

माडेल येथे अँन्थनी रॉड्रिग्ज यांच्या घरासमोर आंब्याचे झाड कोसळले,त्याखाली असलेल्या दोन दुचाकीची काही प्रमाणात मोडतोड झाली. आर्लेम येथे चर्चा समोर एक अवजड ट्रक नाल्यात रुतल्याची‌ घटना घडली. त्यामुळे वाहतुकीला काही काळ अडथळा झाला.

लोटलीत दरड कोसळली

जोरदार पावसात वेर्णा - लोटली लिंक हमरस्‍त्‍यावर अकस्‍मात दरड कोसळल्‍याने एकाबाजूच्‍या रस्‍त्‍यावर मोठ दगड येऊन पडले. त्‍यामुळे हा रस्‍ता एकाबाजूने वाहतुकीसाठी बंद करण्‍यात आला आहे. डोंगर कापून हा हमरस्‍ता बांधण्‍यात आला आहे. उशिरा रस्‍त्‍यावरील दगड हटविण्‍यात यश आले असले तरी रात्री आणखी पाऊस पडल्‍यास पुन्‍हा माती रस्‍त्‍यावर येण्‍याची शक्‍यता असल्‍याने एकाबाजूची वाहतूक बंद ठेवण्‍यात आल्‍याचे प्रशासनाकडून सांगण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com