

ICG Rescues Iranian Fisherman: भारतीय तटरक्षक दलाने पुन्हा एकदा समुद्री सुरक्षेप्रती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याप्रती आपली कटिबद्धता सिद्ध केली आहे. ICG ने अरबी समुद्रात (Arabian Sea) कोचीपासून तब्बल 1500 किलोमीटर दूर एका गंभीर जखमी झालेल्या ईराणी मच्छीमाराला यशस्वीरित्या वाचवले. जखमीला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले होते, जिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. आता त्याची प्रकृती ठीक आहे.
'अल-ओवैस' (Al-Owais) नावाच्या मासेमारी नौकेवरील मच्छीमार अल्लाह बख्श यांना स्फोटामुळे गंभीर दुखापत झाल्याची माहिती ईराणच्या 'एमआरसीसी चाबहार' (MRCC Chabahar) ने मुंबईतील 'एमआरसीसी'ला दिली. ही माहिती मिळताच 'एमआरसीसी मुंबई'ने तातडीने आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली. त्यांनी 'एमटी एस.टी.आय. ग्रेस' या व्यापारी जहाजाला मदतीसाठी वळवले आणि त्याचबरोबर ICG चे जहाज 'आयसीजीएस सचेत' (ICGS Sachet) या बचाव कार्यासाठी रवाना केले.
समुद्राच्या मध्यभागी तातडीची वैद्यकीय मदत पुरवल्यानंतर, जखमी क्रू सदस्याला सुरक्षितपणे 'आयसीजीएस सचेत' जहाजावर हस्तांतरित करण्यात आले. ICG च्या जलद प्रतिसादाने त्या मच्छीमाराला वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली.
पुढील प्रगत उपचारांसाठी हे जहाज गोव्याच्या दिशेने रवाना करण्यात आले होते. गोव्यात पोहोचताच जखमी मच्छीमाराला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. समुद्राच्या मध्यभागी राबवलेले हे दीर्घ पल्ल्याचे बचाव कार्य भारतीय दलांचा व्यावसायिक आणि मानवतावादी दृष्टीकोन दर्शवतो.
दरम्यान, यापूर्वीही ICG ने एका अशाच कामगिरीत 'कस्तुरबा गांधी' जहाजाच्या मदतीने आणि डॉर्निअर विमानाने 11 दिवसांपासून समुद्रात भरकटलेल्या 31 भारतीय मच्छीमारांचे प्राण वाचवले होते. ICG ची ही कामगिरी समुद्रातील जीव वाचवण्यासाठी असलेले त्यांचे समर्पण अधोरेखित करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.