MLA Viresh Boarkar: आगशी पोलिसात माझे बंधू साईश बोरकर याच्याविरुद्ध दाखल झालेल्या तक्रीरीसंदर्भातच्या वृत्तामुळे कुटुंब तणावाखाली आहे. ही घटना वैयक्तिक पातळीवर घडली आहे. त्याच्याशी कोणत्याही आरजी सदस्याचा संबंध नाही.
जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा ही व्हायला हवी असे आपले वैयक्तिक मत आहे, अशी प्रतिक्रिया संशयिताचे बंधू व सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी दिली आहे.
साईश बोरकर व इतर दोघांनी छळ केल्याची तक्रार एका महिलेने आगशी पोलिसात दाखल केली आहे. तिचा पाठलाग करून घरात घुसून धमकी दिली व तिच्या मित्राला माहराण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी आगशी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या घटनेसंदर्भात मत मांडताना आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर आगशी पोलिसांवर दबाव आणला नाही तसेच फोनही केला नाही.जे काही कायदेशीर आहे ते पोलिस तपास करून न्यायालयाला माहिती सादर करतील.
ज्याने गुन्हा केला आहे, त्याला शिक्षा कायद्यानुसार होणे आवश्यक आहे, मग तो माझा भाऊ किंवा कोणीही असो. अशा घटनांचे समर्थन करणार नाही. यापूर्वी आरजी पक्षाविरोधात कारवाया करणाऱ्या तसेच पक्षाच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
सांत आंद्रे मतदारसंघातील लोकांनी मला निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांचा विश्वासघात करणार नाही व कोणावर अन्यायही होऊ देणार नाही. तशी मी आमदार होताना शपथही घेतली आहे. जे काही या घटनेत सत्य आहे ती चौकशीअंती बाहेर येईल. आपण कायदेशीर कारवाईत ढवळाढवळ करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
संशयितांच्या जबान्या नोंद
या घटनेप्रकरणी आगशी पोलिसांनी संशयित साईश बोरकर व त्याच्या दोघा साथीदारांना पोलिस स्थानकात बोलावून त्यांच्या जबान्या नोंद केल्या आहेत. तक्रारदार व संशयित हे दोघेही एकमेकाला ओळखत असल्याने हा त्यांच्यातील अंतर्गत वाद आहे. या प्रकरणाचा तपास करून लवकरच न्यायालयात आरोपपत्र सादर केले जाईल, अशी माहिती आगशीचे पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.