Digambar Kamat: नवीन पिढी घडविण्याचे काम साहित्यिक, शिक्षक, पत्रकारांचे; दिगंबर कामत

Digambar Kamat: प्रमोद प्रभुगावकर यांना चंद्रकांत केणी पत्रकारिता पुरस्कार
Digambar Kamat
Digambar KamatDainik Gomantak
Published on
Updated on

Digambar Kamat: राजकारणी नवीन पिढी घडवू शकत नाही. नवीन पिढीला घडविण्याचे काम साहित्यिक, शिक्षक, पालक व पत्रकार करू शकतात, असे उद्‍गार माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी काढले.

Digambar Kamat
Vasco Accidental Death: मृत शिवानीचा भाऊ, वडिलांना जबानी देण्यासाठी केले पाचारण

पत्रकार, साहित्यिक, विचारवंत स्व. चंद्रकांत केणी यांच्या जयंतीदिनी चंद्रकांत केणी पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रमोद प्रभुगावकर यांना आज कामत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. हा सोहळा मडगाव नगरपालिकेच्या सभागृहात आज संध्याकाळी झाला.

यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत माजी आयएएस अधिकारी अरविंद भाटीकर, दै. ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक, नवप्रभाचे माजी संपादक व ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे उपस्थित होते.

कामत यांनी पुढे सांगितले, की पूर्वीच्या व आताच्या पत्रकारितेमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. ज्या वर्तमानपत्राचे केणी प्रदीर्घ काळ संपादक होते, त्या ‘राष्ट्रमत’ने गोव्यात आपले स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले होते.

केणीसारखे उच्च वैचारिक पातळी असलेले पत्रकार आता मिळणे कठीण. त्याचबरोबर वैयक्तिक व राजकीय जीवन हे दोन्ही वेगळे प्रवाह आहेत. ते एकमेकांशी मिश्रीत करणे योग्य होणार नाही. केवळ एकाच क्षेत्राचा दर्जा घसरला आहे असे म्हणता येणार नाही. संपूर्ण समाजाचाच दर्जा कमी झालेला आहे.

Digambar Kamat
Boma Road Issue: भोम रुंदीकरण नकोच! नागरी प्रश्‍नांवरून ग्रामसभा तापल्या फिल्मसिटीला देखील विरोध

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना आपले मनोगतही व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना प्रमोद प्रभुगावकर यांनी सांगितले की, आपण पत्रकारिता करीत असताना कुठल्याही आमिषांना बळी पडलो नाही.

केवळ स्व. चंद्रकांत केणी यांची शिकवण आचरणात आणण्याचा आपण काटेकोरपणे प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रमत व चंद्रकांत केणी यांच्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ पत्रकार व निवृत्त शिक्षक अनिल पै यांनी मानपत्राचे वाचन केले, तर पत्रकार प्रमोद आचार्य यांनी आभार मानले.

‘पत्रकारितेचा दर्जाही घसरतोय’

सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत माजी आयएएस अधिकारी अरविंद भाटीकर यांनी सांगितले, की चंद्रकांत केणी यांचे योगदान तरुण पिढी विसरत चालली आहे. लोकशाही सध्या एका कठीण परिस्थितीतून जात आहे.

लोकशाहीचा चौथा खांब असे म्हणणाऱ्या पत्रकारितेचा दर्जाही घसरत चालला आहे. भाजपचे सरकार केंद्रात आल्यापासून २०१४ ते २०२२ पर्यंत प्रसारमाध्यमांवर १८ हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे आज तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक, निर्भीड पत्रकार मिळणे कठीण झाले आहे.

‘धारदार पत्रकारितेसाठी लोकांचाही पाठिंबा हवा’

सोहळ्याचे सूत्रसंचालन करताना दै. ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक यांनी अनेक मुद्दे मांडले. त्यांनी सांगितले, की गोव्याची संस्कृती व मूल्ये माहीत नसताना गोव्यात पत्रकारिता करणे कठीण आहे.

‘गोंयकारपणा’ची चळवळ सतत चालू राहिली पाहिजे. पूर्वीप्रमाणे गोव्याचे भवितव्य साहित्यिकांच्या हातातून निसटले असून केवळ राजकारण्यांनी त्यावर पूर्ण कब्जा मिळवलेला आहे. त्याचप्रमाणे पत्रकारिता दर्जेदार, धारदार होण्यास लोकांकडूनही पाठिंबा मिळणे गरजेचे आहे.

‘पांडवा कपेल’ चौकाला चंद्रकांत केणींचे नाव

आके येथील ‘पांडवा कपेल’ चौकाला स्व. चंद्रकांत केणी यांचे नाव देणे विचाराधीन असल्याचे व त्यावर आपण गंभीरपणे प्रयत्न करणार असल्याचे किंवा त्यावर पर्याय शोधण्याचे आमदार दिगंबर कामत यांनी आश्र्वासन दिले.

अनिल पै यांनी हा मुद्दा उपस्थित करताना काही वर्षांपूर्वी या चौकाला स्व. केणी यांचे नाव देण्यास प्रखर विरोध झाला होता व नंतर तो विषय मागे पडला. यावर कामत यांनी पुनर्विचार करावा अशी सूचना केली. त्यावर कामत यांनी वरील उत्तर दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com