सावधान...हरवळे धबधबा आंघोळीसाठी ठरतोय "कर्दनकाळ"

चार वर्षात नऊजणांचा हरवळे धबधब्यात बुडून मृत्यू, बुडालेल्या युवकाचा मृतदेह हाती
हरवळे धबधबा
हरवळे धबधबाDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली (Bicholim) जागतिक पर्यटन (Tourism) स्थळ असलेल्या हरवळे धबधब्यावर (Harvalem Waterfalls) पर्यटनाची मजा लुटण्यासाठी जात असाल, तर सावधान...!. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या धबधब्यावरील पाण्यात आंघोळीसाठी उतरण्यापूर्वी बराच विचार करून आंघोळीचा मोह आवरावा लागेल. याला कारण म्हणजे या धबधब्यावर पर्यटक बुडण्याच्या घडणाऱ्या घटना आहेत. रविवारी (ता.1) या धबधब्यावर मूळ अमृतसर-पंजाब येथील 22 वर्षीय नवज्योत सिंग या युवकाचा दुर्दैवीरित्या बुडून बळी गेला. रविवारची ही घटना धरून मागील चार महिन्यात तीन युवकांना या धबधब्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. (Harvalem Waterfalls in Goa are dangerous for tourists)

तर गेल्या चार वर्षात मिळून या धबधब्यात नऊ पर्यटकांचे बुडून बळी गेले आहेत. मयत नवज्योत सिंग हा या धबधब्यावरील यंदाच्या पावसाळी पर्यटनाचा पहिला बळी ठरला आहे.यावरून पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला हा धबधबा आंघोळीसाठी तेवढाच कर्दनकाळ असल्याचे स्पष्ट होत आहे. या धबधब्यावरील बळी जाण्याच्या घटना पाहता एक तर या धबधब्यावर आंघोळीसाठी कायमची बंदी घाला, किंवा त्याठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करा. अशी मागणी पुढे येत आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी बुडालेल्या नवज्योत सिंग या युवकाचा मृतदेह अखेर आज (सोमवारी) अग्निशमन दलाच्या हाती लागला.

हरवळे धबधबा
Goa: हरवळे धबधब्यात युवक बुडाला

चार वर्षात नऊ बळी

मागील एप्रिल महिन्यात या धबधब्यावर आंघोळीची मजा लुटताना गोलू कुमार आणि सत्यम कुमार या विशीतील मूळ बिहार आणि उत्तरप्रदेशमधील मिळून दोन युवकांना प्राण गमावावे लागले होते. या घटनेला चार महिने उलटण्याआधीच रविवारी आणखी एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला. धबधब्यावर आंघोळीची मजा लुटताना मागील चार वर्षात स्थानिक आणि राज्याबाहेरील मिळून आतापर्यंत नऊ पर्यटकांचे बळी गेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

पर्यटकांचे दुर्लक्ष

हरवळे येथील प्रसिद्ध श्री रुद्रेश्वर देवस्थान परिसरातील हा धबधबा पर्यटन खात्याच्या अखत्यारीत येत आहे. या धबधब्यावरील धोका ओळखून या धबधब्यावर पोलिस सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय श्री रुद्रेश्वर देवस्थानतर्फेही धबधब्यावर एक व्यक्ती तैनात ठेवण्यात आली आहे. मात्र या धबधब्यावर येणारे काही पर्यटक अतिउत्साह दाखवतात. सुरक्षा व्यवस्था आदी सुचनांकडे दुर्लक्ष करून धोका असतानाही आंघोळीसाठी पाण्यात उतरण्याची आततायी करतात. काहीजण धोका पत्करून 'फोटो सेशन' ही करतात. आणि मग काही पर्यटक मृत्यूला मिठी मारतात. पावसाळ्यात धबधब्याचा प्रवाह प्रचंड वाढलेला असतो. अशावेळी पाण्यात उतरणे अत्यंत धोकादायक असते. तरीही काही पर्यटकांना त्याची पर्वा नसते. आणि मग बुडून बळी जाण्याच्या घटना घडतात.

हरवळे धबधबा
गोवा-कर्नाटक सीमेलगतचा दुधसागर धबधबा कॅसलरॉकपासून 13 कि.मी. अंतरावर

नवज्योतचा मृतदेह सापडला

रविवारी सायंकाळी हरवळे धबधब्यात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या मूळ अमृतसर-पंजाब येथील नवज्योत सिंग या युवकाचा मृतदेह काल (सोमवारी) अग्निशमन दलाच्या हाती लागला. डिचोली अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देताच, दलाच्या जवानांनी घटनास्थळी त्याठिकाणी धाव घेवून बोट आणि गळाच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली. काल काळोख पडेपर्यंत बुडालेल्या युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात काल यश आले नव्हते. अखेर अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेतली असता, सकाळीच मृतदेह हाती लागला. यावेळी मयत नवज्योत सिंग याचे नातेवाईक त्याठिकाणी उपस्थित होते. मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीच्या गोमेकॉत पाठविला. प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

ज्यादा सुरक्षा व्यवस्थेची मागणी

"हरवळे धबधबा हा पर्यटन खात्याच्या अखत्यारीत येत असला, तरी हा धबधबा तीर्थक्षेत्र श्री रुद्रेश्वर देवस्थान परिसरात आहे. धबधब्यावर एखादी दुर्घटना घडली, की हा परिसर चर्चेत येतो.धबधब्यावर फक्त शनिवारी आणि रविवारीच पोलिसांची सुरक्षा व्यवस्था असते. धबधब्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी या धबधब्यावर कायम आणि अधिक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याची गरजेचे आहे. तशी मागणी रुद्रेश्वर देवस्थानतर्फे तातडीने डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे."

-सुभाष किनळकर, पदाधिकारी, रुद्रेश्वर देवस्थान.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com