Illegal Construction: गिरकरवाडा-हरमल येथील सर्वे क्रमांक 63/69व 63/92मधील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील एनडीझेडमध्ये हरमल सरपंचांचे वडील तसेच काकाच्या नावावर असलेल्या बेकायदा गेस्ट हाऊसेसना उद्या 2 नोव्हेंबरपर्यंत सील ठोकण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पेडणे उपजिल्हाधिकारी व पोलिसांना दिला आहे.
त्यामुळे सरपंच बेर्नार्ड फर्नांडिस यांना मोठा झटका बसला आहे. या सर्व बांधकामांची तपासणी करून सविस्तर माहितीसह अनुपालन अहवाल येत्या 7 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने गिरकरवाडा-हरमल येथील सर्वे क्रमांक ६३/९२ मधील एनडीझेडमध्ये असलेल्या बेकायदा चारमजली हॉटेलला सील ठोकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिक्रमणविरोधी पथक गेलेही होते. परंतु उच्च न्यायालयात हे प्रकरण असल्याने त्यांना हात हलवत माघारी फिरावे लागले. यासंदर्भातची माहिती उच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आली. सदर चारमजली हॉटेल हे आपले नसून, बाजूला असलेले रेस्टॉरंट फक्त आपले असल्याचे अशोक खंडारी यांनी आज खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे संताप व्यक्त करत सरपंच व सचिव यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
हरमल पंचायत क्षेत्रातील प्रभाग चार मधील नो डेव्हलमेंट झोन मधील ‘ते’ चार मजली हॉटेल, स्वखर्चाने पाडण्याची हमी मालकाने दिल्याचे खात्रीलायक वृत्तानुसार समजते.मात्र, या फुफाट्यात सरपंचाच्या नातेवाईकांचे जुन्या घराच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने सरपंच बर्नार्ड फर्नांडिस यांची जणू अग्नीपरीक्षा ठरल्याचे बोलले जात आहे.
''त्या'' हॉटेलबाबत काल १ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली व हॉटेल मालक अशोक खंडारी याने प्रतिज्ञपत्राद्वारे सात दिवसांत स्वखर्चाने पूर्ण चार मजली इमारत हटवू, लेखी माहिती दिली.त्यामुळे या कारवाईची धास्ती गावातील अन्य व्यवसायिकांना जाणवू लागली असल्याचे समजते. दरम्यान,एका नाट्यमय घडामोडीत विद्यमान सरपंच बर्नार्ड फर्नांडिस यांच्या नातेवाईकांचे जुने व वडिलोपार्जित गेस्ट हाऊसमध्ये व्यावसायिक कारभार न करण्याची ताकिद दिली असून, प्रभाग चार मधील बेकायदा बांधकामे व त्याची यादी देण्याचा न्यायालयीन आदेश पंचायत सचिवास दिल्याचे समजते.
‘केले तुका, झाले माका’ पुढे काय !
ह्या सर्व गदारोळात बेकायदेशीर बांधकाम व नो डेव्हलमेंट झोन मधील बांधकाम सील करण्यापर्यंत गेला होता, त्याची व्याप्ती वाढली असल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू आहे.त्या हॉटेलचा गुगल फोटोत अन्य एक इमारत दिसत असल्याने कोर्टाने दखल घेतली असावी, असा अंदाज काही नागरिकांनी केला. तर ‘त्या’ हॉटेल मालकाने आपल्या विरोधात गेल्याच्या रागातून सरपंचाच्या नातेवाईकाने बांधकाम न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले असावे, अशी चर्चा सुरू आहे.
अन् सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का
अशोक खंडारी यांच्या बेकायदा बांधकामाला टेकूनच असलेले चारमजली हॉटेल व तसेच आणखी एक हॉटेल आहे. ती अनुक्रमे हरमलचे सरपंच बेर्नार्ड फर्नांडिस यांचे काका फ्रान्सिस फर्नांडिस व मयत वडील पास्कोल फर्नांडिस यांच्या नावावर असल्याची माहिती खंडपीठासमोर पुढे आली. या बांधकामांनाही पंचायतीचा, जीसीझेडएम व टीसीपीचा परवाना नाही. ही माहिती ऐकून खंडपीठालाही धक्काच बसला व या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले. पंचायतीनेही नाराजी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.