

मडगाव: साळ नदीतील प्रदूषणाची कारणे शोधण्यासाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाला खारेली-खारेबांध येथे या प्रदूषणामागील नेमके कारण आढळले. या भागात नाल्याच्या तोंडावरच बेकायदेशीर झोपड्या उभारण्यात आल्या असून, येथील रहिवाशांचे मलमूत्र थेट उघड्या नाल्यात सोडले जात असल्याचे दिसून आले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने बुधवारी आरोग्य, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका अधिकाऱ्यांसह साळ नदीला जोडलेल्या व प्रदूषणाचे प्रमुख स्रोत ठरणाऱ्या नाल्यांची पाहणी केली. एकूण पाच ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून, ही पाहणी पुढील दोन दिवस सुरू राहणार आहे. त्यानंतर साळ नदीतील प्रदूषणाच्या स्रोतांबाबत सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या सदस्यांनी दिली.
या संदर्भात केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाजवळील नाला, एसजीपीडीए मार्केटचा नाला, कोंब येथील नाला, खारेली-खारेबांध नाला आणि शिरवडे नाला अशा पाच ठिकाणी पाहणी करण्यात आली.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील पाणी नाल्यात सोडले जात असल्याचे आढळून आले असून, ते थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन इस्पितळ प्रशासनाने दिले आहे. कोंब भागात सांडपाणी वाहिनीत बिघाड झाल्याने दूषित पाणी नाल्यात मिसळत असल्याचेही निदर्शनास आले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाची ही पाहणी पुढील दोन दिवस सुरू राहणार असून, त्यानंतर अहवालाच्या आधारे आवश्यक उपाययोजना ठरविण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.